Rashid Khan Marriage: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू राशीद खान लग्नबंधनात अडकला आहे. राशीद खानच्या लग्नाचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्टार क्रिकेटरने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केले, ज्यामध्ये अफगाणिस्तान संघातील अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले होते. या लग्नाची सोशल मीडियावर आणि क्रिकेट जगतात बरीच चर्चा होत असून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राशिदबरोबर त्याचे इतर तीन भावांनीही लग्न केलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खानने वयाच्या २६ व्या वर्षी लग्न केले. रशीदने ३ ऑक्टोबरला काबूलच्या एका हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात लग्नगाठ बांधली. मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान सारखे स्टार क्रिकेटर्स या खास प्रसंगी रशीदच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पोहोचले. याशिवाय अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झादरन आणि रहमत शाह यांनीही राशिदच्या लग्नाला हजेरी लावली होती. अफगाणिस्तानातील अनेक क्रिकेटपटूंनी रशीदबरोबरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. राशिद खानने कोणाशी लग्न केले याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी रशीदने त्याच्याच नात्यातील एका मुलीशी लग्न केल्याचा दावा अहवालात केला जात आहे.

हेही वाचा – IND W vs NZ W Live Score: टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्डकप मोहिमेला सुरूवात, न्यूझीलंडविरुद्ध मुकाबला

राशिदच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तालिबानी सैनिक एके-47 घेऊन लग्न समारंभात फिरताना दिसले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली, ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राशिदचा विवाह काबुलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडला, ज्यात सहकारी क्रिकेटपटू, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) चे अधिकारी आणि तालिबान सरकारमधील अनेक लोक उपस्थित होते.

हेही वाचा – Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

राशिद खान गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेत अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ असा विजय मिळवून इतिहास घडवला होता. अफगाणिस्तानला प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्यात यश आले.

हेही वाचा – R Ashwin: अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा वेस्ट इंडिज बोर्डाला विसर; विश्वविक्रम गेला लांबणीवर

राशिद खानने चाहत्यांना दिलेलं वचन मोडलं

खरं तर, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी राशिद खानने चाहत्यांना वचन दिले होते की तो अफगाणिस्तानला विश्वचषक जिंकून देईपर्यंत लग्न करणार नाही. पण आता त्याने लग्न करून त्याच्या चाहत्यांची मनं मोडली आहेत. त्यामुळे चाहते नाराज आहेत. पण त्यांनी राशिदला त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ आणि टी२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानने आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या संघाने गेल्या दोन आयसीसी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत साधारण संघ नसल्याचे दाखवून दिले आहे. अफगाणिस्तानने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या मोठ्या संघांना पराभूत केले होते, तर ते प्रथमच टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचले होते. मात्र उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला.