अफगाणिस्तानचा तरुण क्रिकेटपटू राशिद खानला ऑस्ट्रेलियाच्या बिगबॅश लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. अॅडीलेड स्ट्राईकर या संघाने सातव्या पर्वासाठी राशिद खानला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. यासोबत राशिद खान ऑस्ट्रेलियाच्या बिगबॅश लीग स्पर्धेत खेळणारा पहिला अफगाणी खेळाडू ठरला आहे.

काही दिवसांपूर्वीच राशिद खानने कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवली होती. तर आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडूनही राशिदने चांगली गोलंदाजी केली होती.

“मला मिळालेल्या संधीबद्दल मी खूप आनंदी आहे. बिगबॅश लीग स्पर्धेत अॅडीलेड स्ट्राईकरसारख्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी मोठा गौरव आहे. या स्पर्धेत माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करणारा मी पहिला खेळाडू ठरणार असल्यामुळे माझ्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.” राशिद खानने मिळालेल्या नवीन संधीबद्दल पत्रकारांशी बोलताना आनंद व्यक्त केला.

गेल्या वर्षभरात राशिदने टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःचा खेळ सुधरवला आहे. त्याच्या गोलंदाजीतही चांगलं वैविध्य असल्यामुळे समोरच्या फलंदाजाला तो बुचकळ्यात पाडू शकतो. त्यामुळे अॅडीलेड संघाला राशिद खानचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. अॅडीलेड स्ट्राईकर संघाचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनी राशिदच्या संघातील समावेशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

Story img Loader