स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने काल शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएल २०२२ चा भागही असणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष जगभरातील टी-२० लीगवर केंद्रित केले. आयपीएलमध्ये, तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फ्रेंचायझीचा एक भाग होता.
२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डिव्हिलियर्सने ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक, शतक आणि १५० धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मिस्टर ३६० डिग्री नावाने प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने आपल्या कारकिर्दीत जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना ज्या प्रकारे मात दिली, त्यामुळे गोलंदाजांच्या मनातही त्याच्या नावाची भीती निर्माण झाली.
अफगाणिस्तान आणि सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज राशिद खान याने डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिलीय. ”माझ्यासाठी आणि सर्व गोलंदाजांसाठी निश्चितच दिलासादायक गोष्ट आहे. अद्भुत आठवणी आणि माझ्यासोबत अनेक तरुणांना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुला नक्कीच मिस करू”, असे राशिदने आपल्या ट्विटरवर म्हटले.
हेही वाचा – End Of An ERA..! डिव्हिलियर्समधून क्रिकेट निवृत्त; भावूक नेटकरी म्हणाले, “आम्ही तुला…”
२०१६ मध्ये, डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवरच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५७ धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात आरसीबीने ४ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा केल्या. विराटने ७५ आणि एबीने ८२ धावांची शानदार खेळी केली. डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.
डिव्हिलियर्सने १८४ आयपीएल सामन्यांमध्ये ३९.७० च्या सरासरीने ५,१६२ धावा केल्या. ज्यामध्ये ३ शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात त्याने ६ डावात ५१.७५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या. मात्र, यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लेगमध्ये त्याला अप्रतिम कामगिरी करता आली नाही.