Rashid Khan big statement: अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमधील महिलांची स्थिती सुधारेपर्यंत विचार केला जाणार नाही, असे सांगत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेत खेळण्यास नकार दिला होता. आता राशिद खाननेही एक पोस्ट टाकून क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला थेट विरोध दर्शवला आहे.
राशीद खानची पोस्ट –
राशीदने आपल्या ट्विटमध्ये लिहले,” ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाबद्दल ऐकून मी खरोखर निराश झालो आहे. मार्चमध्ये ते आमच्यासोबत मालिका खेळणार नाहीत. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि जगात आपण केलेल्या महान प्रगतीचा मला नेहमीच अभिमान वाटतो. सीएचा हा निर्णय आपल्याला या प्रवासातून माघारी घेऊन जात आहे. जर ऑसीजना अफगाणिस्तानबरोबर खेळण्यास योग्य वाटत नसेल, तर मला वाटते की मी पण बीबीएल खेळण्याबाबत विचार करावा.”
एसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “मार्चमध्ये अफगाणिस्तानच्या घरच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक विधानामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड अत्यंत निराश आणि दुःखी आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अधिकृतपणे पत्र लिहिणार आहे.”
एसीबीने पुढे म्हटले, ”ऑस्ट्रेलियन सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर आणि संभाव्य अंमलबजावणीनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यांमधून माघार घेण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय, राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश करण्याचा आणि खेळाचे राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे.”
अफगाणिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध –
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. त्यांना अभ्यासासोबत घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाही. मुलींना खेळात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे