बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात नवख्या अफगाणिस्तानच्या संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अफगाणिस्तानकडे ३७४ धावांची भक्कम आघाडी असून त्यांचे दोन फलंदाज मैदानावर येणं शिल्लक आहे. अफगाणिस्तानचा नवोदीत युवा कर्णधार राशिद खानने या सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

पहिल्या डावात राशिद खानने ५१ धावांची अर्धशतकी खेळी करत अफगाणिस्तानला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर गोलंदाजीत बांगलादेशचा निम्मा संघ गारद करत अफगाणिस्तानची बाजू वरचढ केली. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदी पदार्पण करताना फार कमी खेळाडूंना अशी कामगिरी जमली आहे. राशिद खानने या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे.

बांगलादेशला पहिल्या डावात २०५ धावांमध्ये गारद केल्यानंतर अफगाणिस्तानला १३७ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आश्वासक खेळ करत ८ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ आपला पहिला वहिला कसोटी विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader