टी २० विश्वचषक २०२१ साठी अफगाणिस्तानने आपल्यचा १८ सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. मात्र संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर कर्णधार राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. राशिद खानने या निर्णयामधील कारण सांगितलं असून ते ऐकून त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. राशिद खानने आरोप केला आहे की अफगाणिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी संघाची निवड केली त्या बैठकीला आपल्याला बोलवण्यात आलं नव्हतं. म्हणजेच विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी संघ निवड करताना राशिद खानशी कोणतीही चर्चा केली नाही, त्याचा सल्ला घेतला नाही. कर्णधारालाच डावलून हा संघ निवडण्यात आलाय. त्यामुळेच संघ जाहीर होताच राशिद खानने कर्णधारपद सोडलं आहे.

संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर राशीद खानने गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास (भारतीय प्रमाण वेळेनुसार) आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक मेसेज पोस्ट केला. नमस्कार आणि अफगाणिस्तानच्या झेंड्याचा इमोजी वापरुन या फोटोला त्याने कॅप्शन दिलीय. या पोस्टमध्ये राशिदने, “कर्णधार आणि देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मला संघाची निवड करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार होता. निवड समिती आणि एसीबीने संघाची घोषणा करण्याआधी माझा सल्ला घेतला नाही. म्हणून मी आता या क्षणापासून अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे. अफगाणिस्तानसाठी खेळता आलं याचा मला कायम अभिमान राहील,” असं म्हटलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने संघ निवडण्याआधी कर्णधार राशिद खानचा सल्ला घेतला नसला तरी त्यांनी उत्तम खेळाडूंचा सहभाग असणारा संघ टी २० विश्वचषकसाठी निवडला आहे. संघामध्ये ६ गोलंदाज, ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने दोन राखीव खेळाडू ठेवले आहे. अफगाणिस्तानच्या संघात राशिद खान, हजरतुल्लाह जजाई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, कायस अहमद आणि नवीन उल हकसारखे टी-२० स्पेशलिस्ट खेळाडू आहेत. हे खेळाडू जगभरातील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळल्याने ते कोणत्याही मोठ्या संघाला सहज हरवू शकतात.

टी २० विश्वचषकसाठीचा अफगाणिस्तानचा संघ पुढीलप्रमाणे –  राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान आणि कायस अहमद