सध्या चर्चेत असलेल्या टी१० लीग स्पर्धेत पखतून्सने मराठा अरेबियन्स संघावर ८ गडी विजय मिळवला. मराठा अरेबियन्स संघाने १० षटकात १२६ धावा केल्या होत्या. हे आव्हान पखतून्स संघाने ९.२ षटकांतच पार केले. कॅमेरून डेलपोर्ट याच्या नाबाद ३६ आणि कॉलिन इनग्राम याच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर हे त्यांनी आव्हान पूर्ण केले. शफिकउल्लाहने ३५ धावांची खेळी करताना संघाच्या विजयात हातभार लावला.

या सामन्यात चर्चा रंगली ती रशीद खान याच्या हेलिकॉप्टर शॉटची. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने या फटक्याला लोकप्रियता मिळवून दिली. हा फटका पखतून्स विरुद्ध अरेबियन्स या सामन्यात रशीदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अरेबियन्स संघाकडून रशीद खानने हा फटका मारत षटकार वसूल केला. त्याचा हा फटका पाहून वीरेंद्र सेहवागही खुर्चीतुन उठून टाळ्या वाजवू लागला. रशीदने स्वतः हा व्हिडीओ ट्विट केला असून त्यात महेंद्रसिंग धोनी याला टॅग केला आहे.

दरम्यान, पखतून्सने नाणेफेक जिंकून अरेबियन्सना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अरेबियन्सचे सलामीवीर झटपट माघारी धाडून पखतून्सने हा निर्णय योग्य ठरवला. हझरतुल्लाह जाझई (४) आणि अॅलेक्स हेल्स (६) हे स्वस्तात बाद झाले. नजीबुल्लाह झादरान (३६) आणि कामरान अकमल (२५) यांनी संघाचा डाव सावरला. ब्रेंडन टेलर (२३) आणि रशिद (२१) यांनी तळाला फटकेबाजी करताना संघाला ६ बाद १२५ धावा करून दिल्या.

Story img Loader