Pakistan name missing from team jerseys in Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ ही स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली आहे, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वादाशी असलेले नाते संपण्याचे दिसत नाहीत. यावेळी वादाचे कारण ठरले आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या जर्सी. खरे तर आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या जर्सीवर यजमान पाकिस्तानचे लोगो खाली नाव नसल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते आपल्याच क्रिकेट बोर्डावर नाराज झाले आहेत.
मुलतानमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यानंतर, माजी कर्णधार राशिद लतीफनेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली. आशिया कप २०२३ चे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात असले तरी अधिकृत यजमान पाकिस्तान आहे.
एसीसीवर भडकले राशिद लतीफ –
राशिद लतीफ म्हणाले, “हे मान्य नाही आणि आशियाई क्रिकेट परिषदेला हे स्पष्ट करावे लागेल. कारण आशिया कप ही त्यांची मालमत्ता आहे. ते पुढे म्हणाले, “पीसीबीने अनौपचारिकपणे असे सांगून वाद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले एसीसीने गेल्या वर्षीच्या आशिया चषकानंतर निर्णय घेतला होता की, भविष्यातील स्पर्धांमध्ये यजमान देशाचे नाव आशिया चषकाच्या लोगोसोबत दिले जाणार नाही.”
हेही वाचा – IND vs PAK सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला केले सतर्क; म्हणाला,”पाकिस्तानची ताकद ही त्यांची….”
मात्र सोशल मीडियावरील बहुतांश पाकिस्तानी क्रिकेट चाहते हे स्पष्टीकरण मानायला तयार नाहीत. काही लोकांनी असा सवालही केला आहे की, जर एसीसीने असा निर्णय घेतला असेल, तर १५ वर्षांनंतर पाकिस्तान बहुराष्ट्रीय संघाचे आयोजन करत असताना पीसीबीने ते का मान्य केले?
माजी कसोटीपटू मोहसीन खानने प्रश्न उपस्थित करताना म्हणाले, “याला काही अर्थ नाही. मग एसीसीने जुलैमध्ये मलेशियामध्ये झालेल्या आशियाई इमर्जिंग नेशन्स कप किंवा आशियाई अंडर-१६ स्पर्धेच्या लोगोवर यजमान देशाचे नाव का दिले?” असा सवाल माजी कसोटीपटू मोहसीन खानने उपस्थित केला. मोहसीन खान म्हणाला की, एसीसीने संभ्रम दूर करावा.
पाकच्या माजी क्रिकेटपटूचा बीसीसीआयवर आरोप –
नाव न सांगू इच्छिणाऱ्या आणखी एका माजी खेळाडूचा असा विश्वास आहे की एसीसीचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह, हे अधिकृत लोगोवर पाकिस्तानला यजमान राष्ट्र म्हणून मान्यता न देण्याचे कारण होते. तो म्हणाला, “दोन्ही देशांमधील सध्याची परिस्थिती पाहता, कदाचित बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला असे वाटले असेल की भारतीय संघातील खेळाडूंना आशिया कपच्या अधिकृत लोगोवर पाकिस्तानचे नाव असलेली किट घालणे लाजिरवाणे असेल.” रशीद लतीफ यांनी ही शक्यता नाकारली नाही आणि जे काही घडले, ते लज्जास्पद असून त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले.