Rashid Latif has sent a legal notice to former cricketer PJ Mir: पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या सर्व काही ठीक चाललेले नाही. वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग ४ पराभवानंतर बाबर आझम आणि बोर्ड अध्यक्ष झका अश्रफ यांच्यात मतभेदाची बातमी आली होती. झकाने बाबरच्या वैयक्तिक चॅट्सही लीक केल्या होत्या. दरम्यान, माजी दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटर रशीद लतीफने माजी क्रिकेटपटू पीजे मीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
यामध्ये माफी न मागितल्यास ३० कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. एका वाहिनीशी बोलताना मीरने दावा केला होता की, १९९३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर लतीफने माजी दिग्गज क्रिकेटर जावेद मियांदादला कानशिलात मारली होती. मात्र, लतीफपासून मियांदादपर्यंत अनेकांना अशा गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असल्याचे सांगितल्या आहेत.
माजी दिग्गज क्रिकेटपटू रशीद लतीफने एक्सवर लिहिले, “मी महान क्रिकेटपटू जावेद मियांदादला कधीही कानशिलात मारली नाही. तसेच त्यांच्यासमोर आवाजही उठवला नाही. जावेद भाई हे केवळ क्रिकेटचे दिग्गज नाहीत, तर उलट ते राष्ट्रीय नायक आणि पाकिस्तानचा अभिमान आहेत.” तो म्हणाला की, “जावेद मियांदादच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानसाठी पदार्पण करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते एक क्रिकेटची संस्था आहेत आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी वडिलांप्रमाणे त्यांचा आदर करतो. मी माझ्या वकिलामार्फत पीजे मीर यांना बिनशर्त माफी मागण्यास आणि १४ दिवसांत त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास कायदेशीर नोटीस पाठवली आहे.”
अन्यथा ३० कोटी रुपये द्यावे लागतील –
रशीद लतीफ यांनी नोटीसमध्ये बिनशर्त माफी मागावी असे म्हटले आहे. पाकिस्तानसाठी ३ वनडे खेळलेल्या ७० वर्षीय पीजे मीरने माफी मागितली नाही आणि आपले म्हणणे सिद्ध करू शकले नाही, तर त्याला ३० कोटी रुपये द्यावे लागतील. मीरच्या दाव्यानंतर जावेद मियांदाद म्हणाले होते की, ”पीरने माझ्या आणि रशीद लतीफबद्दल निराधार आणि चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत. लतीफ हा माझ्या भावासारखा असून त्याने कधीही माझा अपमान केला नाही. पीसीबीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी मी माझ्या नावाचा वापर करू देणार नाही.”
पीजे मीर यांनी समा टीव्हीशी बोलताना सांगितले होते की, “मी १९९३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात संघातील गटबाजी पाहिली होती. मी लंडनहून अँटिग्वाला गेलो आणि तत्कालीन संघ व्यवस्थापक खालिद महमूद यांना ड्रेसिंग रूममधील वातावरणावर भाष्य करू नका असे सांगितले. यादरम्यान रशीद लतीफने जावेद मियांदादला कानशिलात मारली. हे मी बघत होतो. मला वाईट वाटलं, पण मी जावेद मियांदादला विसरायला सांगितलं होतं.”