युवा खेळाडूंमधील गुणवत्ता पारखून घेण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताने उदयोन्मुख खेळाडूंचा संघ पाठवला, पहिले तिन्ही सामने जिंकल्यावर राखीव खेळाडूंना उर्वरित दोन सामन्यांमध्ये संधी मिळणे अपेक्षित होते. काही खेळाडूंना संधी मिळालीही, पण जम्मू आणि काश्मीरचा पहिलावहिला क्रिकेटपटू परवेझ रसूल मात्र झिम्बाब्वे दौऱ्यावर पर्यटकच ठरला.
या दौऱ्यात मोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना संधी मिळली, पण रसूल पदार्पणापासून वंचितच राहिला. रसूलने यंदाच्या रणजी हंगामात अफलातून कामगिरी करत सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावले होते. त्याने ५४च्या सरासरीने ५९४ धावा केल्या, तर १८.०९च्या सरासरीने ३३ बळी मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र तरी त्याच्या पदरी निराशाच पडली.
परवेझ रसूलसारख्या युवा खेळाडूला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी बीसीसीआयने द्यायला हवी होती. परवेझला झिम्बाब्वे दौऱ्यात एकही सामना न खेळवल्याने मी निराश झालो आहे. झिम्बाब्वेच्या दौऱ्यात तुम्ही परवेझला मानसिक खच्चीकरण करण्यासाठी नेले होते का?
– ओमर अब्दुल्ला,
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री

Story img Loader