Ratan Tata Death News Cricketers Paid Tribute: पद्मविभूषण भारताचे नामवंत उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेयरमन रतन टाटा यांचं बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. भारतीय उद्योगांचे प्रमुख म्हणून ओळख असणारे, रतन टाटा यांनी जागतिक स्तरावर टाटा समूहाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रतन टाटा यांच्या निधनावर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने सर्वांचं लक्ष वेधून घेणार आणि भावुक ट्विट केलं आहे. तर इतरही अनेक क्रिकेटपटूंनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.
वीरेंद्र सेहवागने एक्सवर रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज भारताने खरे रत्न म्हणजेच श्री रतन टाटा यांना गमावले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन हे आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी असेल आणि ते आपल्या मनात कायम राहतील, ओम शांती”
वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेटपटू
सेहवागनंतर हरभजन सिंगने रतन टाटा यांचा फोटो शेअर करत आदरांजली वाहिली. तर प्रज्ञान ओझानेही भावुक करणारं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे, त्यात तो म्हणाला, “श्री रतन टाटा यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झालं. त्यांच्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वाने केवळ टाटा समूहच नव्हे तर भारतीय उद्योगक्षेत्रालाही एक आकार दिला आहे. त्यांची कल्पकता आणि परोपकार यांचा वारसा कायमच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा असेल. त्यांचे कुटुंब, मित्र आणि त्यांच्या उल्लेखनीय जीवनाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना.”
हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल
शिखर धवन, इरफान पठाण यांनीही भावुक होत रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. रतन टाटा यांचे भारतासाठीचे उद्योग क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत त्यांचा वारसा पुढे असाच अविरत कायम राहील असे क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. जमशेदजी टाटा यांच्या काळापासूनच टाटा समूह क्रिकेटला पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आला आहे. हल्ली सर्वांच्या कायमच ओठी असणारं टाटा आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे टायटल स्पॉन्सरही टाटा समूह आहेत.