एखाद्या क्रिकेटपटूभोवती प्रसिद्धीचे वलय असते, तेव्हा त्याचा जाहिरातींच्या बाजारपेठेतील भाव सतत तेजीत असतो. पण एकदा तो निवृत्त झाला की त्याच्याभोवतीचे प्रसिद्धीचे वलय कमी होते आणि त्याचा भावही (ब्रँड व्हॅल्यू) घसरतो. विक्रमवीर सचिन तेंडुलकर याच्याबाबत असाच अनुभव येणार की काय, अशी चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे.
सचिनकडे सध्या दीड डझनापेक्षा जास्त जाहिरातींचे (ब्रँडिंगचे) करार असून, त्याबद्दल त्याला दोनशे कोटींपेक्षा जास्त मानधन मिळत आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारली असून, त्याचा अनिष्ट परिणाम त्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याने केलेले करार कमी होण्याची शक्यता सध्या नसली तरी त्याची किंमत ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले, ‘‘कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो. सचिन याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे पूर्वी त्याची पुरस्कर्त्यांवर जेवढी हुकूमत होती, तेवढी आता त्याच्याकडे राहणार नाही. त्याच्याकडे असलेल्या जाहिराती अन्य कीर्तिवान खेळाडूंकडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सचिनला जे क्रिकेटमध्ये स्थान आहे, ते स्थान घेणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंकडे या जाहिराती जाण्याची शक्यता आहे.’’
सचिनकडे सध्या असलेल्या करारांपैकी काही करारांची मुदत या वर्षअखेरीस संपत असल्यामुळे या करारांचे नूतनीकरण होण्याची शक्यता कमी झाली आहे. एक-दोन कंपन्यांनी यापूर्वीच आपल्या जाहिरातींमधून सचिनऐवजी अन्य तरुण चेहऱ्यास पसंती केली आहे. अनेक शीतपेये कंपन्यांपासून आरोग्यवर्धक पेयांपर्यंत अनेक उत्पादनांचा तो ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. केवळ भारत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आदर्श खेळाडू म्हणून सचिनचा नावलौकिक आहे. या नावलौकिकामुळेच जाहिरातीच्या बाजारपेठेतही त्याचे नाव अग्रेसर आहे. मात्र आता वन डेतून त्याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या या बाजारपेठेतील नावलौकिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.        

Story img Loader