मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. बीसीसीआयचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांच्यावर मंगळवारी एमसीएने गंभीर कारवाई करीत पाच वर्षांची बंदी घातली आहे. अहमदाबादला झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यासंदर्भातील तिकिटांचा एमसीएच्या पदाधिकाऱ्याने काळा बाजार केल्याचा आरोप शेट्टी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केला होता.
‘‘एमसीएशी संलग्न असलेल्या कोणत्याही क्लब्जचे प्रतिनिधित्व करण्यास त्यांना पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. एमसीएच्या वास्तूमध्ये येण्यास त्यांना प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. त्यांच्या रोजीरोटीवर गदा येईल, अशी कारवाई आम्ही केलेली नाही,’’ अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
शेट्टी यांच्यावर २ जून २०१८पर्यंत बंदी असेल आणि ते याविरोधात न्यायालयात दाद मागू शकतील. शेट्टी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक आहेत आणि त्यांचे मुख्यालय वानखेडे स्टेडियमवरच आहे.
सावंत पुढे म्हणाले की, ‘‘२२ डिसेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप शेट्टी यांनी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांवर केला होता. एमसीएने यासंदर्भात केलेल्या चौकशीनंतर यात तथ्य नसल्याचे सिद्ध झाले.’’
एमसीएच्या प्रशासन कारभारात बरीच वष्रे कार्यरत असलेल्या शेट्टी यांच्यावर कारवाईचे संकेत १४ मे रोजी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्येच देण्यात आले होते. परंतु एमसीएने वार्षिक सर्वसाधारण सभेचे व्हिडीओ चित्रण पाहून आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी शेट्टी यांना काही दिवसांची मुदत दिली होती. मंगळवारी एमसीएने शेट्टी यांना पाच वष्रे बंदी घालण्यात आल्याचे पत्र पाठवले, असे सूत्रांकडून समजते.

‘‘एमसीएच्या २२ मार्चला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे प्रकरण मी मांडले होते आणि मी कोणतीही चूक केली नव्हती.  एमसीएचा कुणी गैरवापर करीत असेल तर मी शांत राहणे योग्य ठरले नसते. ९ एप्रिल २०१३ला माझ्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस एमसीएच्या अध्यक्षांनी बजावली होती. त्यानंतर मी या नोटिशीला उत्तर दिले होते. माझ्यावरील वैयक्तिक आकसापोटी आणि पुढील निवडणूक मी लढवू नये, याकरिता ही कारवाई करण्यात आलेली आहे. या लोकशाही विरोधातील निर्णयाबाबत मी असोसिएशन आणि कायद्याने लढा देईन.’’
-रत्नाकर शेट्टी, बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक

Story img Loader