न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. लॅथम आणि विल यंग यांनी भारताच्या पहिल्या डावात केलेल्या ३४५ धावांना प्रत्युत्तर देताना चांगली सुरुवात केली आणि या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. किवी सलामीवीर यंगने ८९ धावा केल्या, तर लॅथमला अक्षर पटेलने ९५ धावांवर बाद केले. लॅथमचा डाव भारताला लवकर संपुष्टात आणता आला असता, मात्र डीआरएस न घेतल्यामुळे तो जास्त वेळ मैदानावर उभा राहिला.

लॅथम ६६ धावांवर खेळत असताना फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने त्याला पायचीत पकडले. भारतीय क्षेत्ररक्षकांनीही अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला नाही. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेनेही रिव्ह्यू घेतला नाही, जो चूक असल्याचे सिद्ध झाले, कारण रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू मधल्या यष्टीवर आदळत होता.

हेही वाचा – “BCCI असो किंवा, कोणीही…”, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत क्रीडामंत्र्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

स्क्रीनवर रिप्ले प्ले केल्यानंतर भारतीय संघाला चूक लक्षात आली. एवढ्या चांगल्या चेंडूवर फक्त एका चुकीमुळे लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवता न आल्याने अश्विनही भडकला. त्याने मैदानावरच आपला राग काढला. त्याने निराशेने जमिनीवर लाथ मारली. असे असले तरी त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडचा डाव २९६ धावांवर रोखला.

Story img Loader