IND vs ENG 2nd T20I Highlights in Marathi: तिलक वर्मा आणि रवी बिश्नोईने भारत वि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला शानदार विजय मिळवून दिला. तिलक वर्मा पहिल्यापासूनच मैदानात पाय रोवून घट्ट उभा होता. भारताने झटपट विकेट गमावल्यानंतर २ विकेट्स बाकी असताना रवी बिश्नोई त्याला साथ देण्यासाठी मैदानात आला. भारताला १८ चेंडूत २० धावांची गरज असताना बिश्नोई मैदानात आला आणि त्याने त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार लगावत धावांचं ओझ कमी करत तिलकसाठी पुढची कामगिरी सोपी करून दिली. पण या खेळीदरम्यान दोघांमध्ये नेमकं बोलणं झालं, हे रविने सामन्यानंतर सांगितलं.
तिलक वर्माने या सामन्यात मॅचविनिंग खेळी करत ५५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७२ धावा केल्या तर रविने ५ चेंडूत २ चौकारांसह ९ धावा केल्या. ज्या भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण होत्या. भारताच्या रवी बिश्नोईने सांगितले की, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मी आणि तिलकने शेवटपर्यंत हार मानली नाही. उलट आपणच जिंकू असा आत्मविश्वास एकमेकांना देत या विजयापर्यंत पोहोचले. भारताने १६६ धावांचे लक्ष्य चार चेंडू बाकी असताना पूर्ण केले आणि सामना दोन विकेट्सने जिंकला.
सामन्यानंतर रवी बिश्नोई म्हणाला, “आम्ही दोघांनी एकमेकांना सांगितलं की चल प्रयत्न करूया, आपण जिंकू. तो (तिलक वर्मा) मैदानात सेट झाला होता आणि मला घाईत कोणताही शॉट खेळायचा नव्हता कारण आमच्या हातात कमी विकेट्स होत्या. आजच मी इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली, ज्यामध्ये फक्त फलंदाजांनीच सर्व आनंद का लुटावा, असं लिहिलं होतं. जेव्हा माझ्याकडे स्ट्राईक आला तेव्हा त्यांनी स्लिपमध्ये एक फिल्डर उभा केला, तेव्हाच मला कळलं तो (लियाम लिव्हिंगस्टोन) लेग-स्पिनने मला बाद करण्याचा प्रयत्न करेल. पण मी त्या फिरकीवर चौकार मारला.”
तिलक वर्माच्या खेळीबद्दल बिश्नोई म्हणाला, “टी-२० मधील एक सर्वाेत्कृष्ट खेळी होती. एका बाजूने विकेट पडत होते, या विकेटवर मैदानात टिकून राहणं सोपं नव्हतं आणि त्यांचं गोलंदाजी आक्रमण पाहाल तर सर्व उत्कृष्ट गोलंदाज होते. तो (तिलक) अशीच कामगिरी गेल्या २-३ महिन्यांपासून करत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत दोन शतकं झळकावली, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिर केली. आम्हाला माहित होतं एक मोठी खेळी नक्का पाहायला मिळेल.”
बिश्नोईबरोबरच्या भागीदारीबद्दल बोलताना वर्मा म्हणाला, “मी त्याला त्याच्या पद्धतीने खेळत गॅपमध्ये शॉट्स मारायला सांगितले. त्याने लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर फ्लिक खेळला आणि चौकार मारला, ज्यामुळे माझं काम थोडं सोपं झालं.” रवी बिश्नोईने दोन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केली पण त्याला विकेट मात्र मिळाली नसली तरी त्याने फलंदाजीत आपली चमक दाखवून दिली.