पूर्वी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत माहेरी आलेल्या लाडक्या लेकीला सुट्टी संपल्यावर वडिलांनी सासरी पोचत करून यायची पद्धत होती.मुलीला कोणताही त्रास होऊ नये, म्हणून वडील मुलीची ट्रंक स्वतः उचलून एसटीत बसून तिकीट काढून सासरी घरात सोडून येत असत. काळजाचा तुकडा सासरी सोडताना वडिलांना कमालीचे दुःख होत असे. रोहित शर्माची फलंदाजी बघून त्या माहेरवाशीणीचे वडील आठवले. ज्या प्रेमाने वडील मुलीला पोचत करतात तितक्याचं प्रेमाने रोहित चेंडूला सीमापार पोचत करतो. रोहित चेंडू फटकावतो म्हणणे अन्यायकारक होईल. तो चेंडू असा पोचत करतो की चेंडू मारताना तो चेंडूची भावूक पणे माफ़ी मागत असेल. चेंडूला काहीही त्रास न होता तो सीमापार जाईल अशी नजाकत. धर्मशालाच्या टी-२० मध्ये आणि कानपूरच्या वन डे मध्ये त्यांनी केलेली फलंदाजी म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता तर एखाद्या संतूर वादकाने अलगद छेडलेल्या विलक्षण सुखावह संतूरच्या तारा होत्या. आवडलेले खाद्य तोंडाने रवंथ करत खाल्ले जाते, तशी त्याची फलंदाजी डोळ्याने रवंथ करत पाहण्यासारखी असते. फास्ट बोलर्सला आळोखेपिळोखे देत मारलेले कव्हर ड्राईव्ह, इमरान ताहिरला एक्सट्रा कव्हरवरून मारलेले अलगद शॉट्स, फास्ट बोलर्स ला स्क्वेअर लेगला तटवलेले षटकार पाहून स्विस घडयाळांना वाटले असेल की ‘असे टाइमिंग तर आपण पण दाख़वू शकत नाही’. सगळाच अविश्वसनिय टाइमिंगचा प्रकार. विराट कोहलीने रोहितचे शतक झाल्यावर ज्या प्रकारे त्याला अलिंगन दिले त्यात विलक्षण कौतुक होते. ‘अशी कमाल फलंदाजी तूच करू जाणे’ ही सही करून दिलेली पावती होती.
ही नजाकत रोहितमध्ये आहे हे आपल्याला सर्वाना माहितच होते. पण आपल्याला बोचत होता तो सातत्याचा अभाव. काही वेळा बेफिकीरी. पण मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यापासून त्याचा दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटतोय. ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशाविरुद्ध खेळलेल्या इनिंग नंतर असे वाटू लागले की भारताच्या फलंदाजीचे सुद्धा जबाबदारीने पालकत्व घ्यायला तो आपली मानसिकता बदलतोय. तो वेळ देऊन खेळतोय. त्याची शतके मोठी होत चालली आहेत. नजाकतीला सातत्याची जोड़ नक्की मिळतीये. भारतीय क्रिकेटकरता हां शुभसंकेत आहे.
‘रोहितच्या शतकानंतर देखील मॅच हरलो मग काय उपयोग?’ असं वाटण्यापेक्षा या खेळीचे आपण साक्षीदार होतो यात विलक्षण आनंद आहे. उपयोग, निरूपयोग, नफ़ा, तोटा याच्यापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ आनंदाच्या निधानाने रोहितजी फलंदाजी पाहिली तर त्याचे मोल शब्दांत करणे अवघड आहे. चला तर मग प्रेक्षक आणि समीक्षकाची झूल उतरवून रसिकाचा भरजरी पेहराव घालूया आणि रोहितचे तोंडभरून कौतुक करूया. सूपर्ब रोहित. तबियत खुश हो गयी.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com