इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर आता भारतीय संघात मोठय़ा प्रमाणावर बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून संघाला यशोशिखरावर नेण्यात अपयशी ठरलेल्या प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांची संघाच्या संचालकपदी नियुक्ती करत फ्लेचर यांची एक प्रकारे कोंडी केली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी गोलंदाजी प्रशिक्षक जो डावेस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनाही विश्रांती दिली आहे.
कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर बीसीसीआयने भारताच्या संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे पाऊल उचलले आहे. माजी क्रिकेटपटू संजय बांगर आणि भरत अरुण यांना सहप्रशिक्षकपदी नियुक्त करत क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी आर. श्रीधरचा समावेश करण्यात आला आहे. फ्लेचर यांचा करार पुढील वर्षी एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार असला तरी शास्त्री यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे फ्लेचर यांचे पंख छाटले गेले आहेत.
कठीण काळात संघासाठी मदतीचा हात पुढे करणारे अशी शास्त्री यांची ओळख होत आहे. २००७ विश्वचषकात भारताला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर ग्रेग चॅपेल यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्या वेळी शास्त्री यांची बांगलादेश दौऱ्यासाठी क्रिकेट व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ‘‘गेल्या काही आठवडय़ांपासून बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी शास्त्री यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लेचर हे मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असून शास्त्री यांच्याकडे भारतीय संघाबाबतचे सर्वाधिकार असतील,’’ असे बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे.
कसोटी मालिकेत इंग्लंडकडून ३-१ असा दारुण पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी फ्लेचर यांना डच्चू देण्याची मागणी केली होती. फ्लेचर यांचे योगदान आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणांवरही त्यांनी टीका केली होती. फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने उपखंडाबाहेरील १३ कसोटी सामने (इंग्लंडमध्ये ७, ऑस्ट्रेलियामध्ये ४, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रतेकी एक) गमावले आहेत.
शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंची कामगिरी सुधारेल -संजय पटेल
सहयोगी प्रशिक्षकांवर एक नजर
संजय बांगर
* यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक
* स्थानिक आणि देशांतर्गत क्रिकेटची सखोल जाण
* अफलातून कौशल्यामुळे भारताचे भावी प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते
भरत अरुण
* कपिल देव यांच्यासोबत गोलंदाजीची सुरुवात ते करायचे
* २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक
* सात वर्षांपासून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत
आर. श्रीधर
* १९ वर्षांखालील संघाचे तसेच आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
* शिस्तबद्ध योजनांसाठी युवा खेळाडूंमध्ये लोकप्रिय