भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर हे अतिशय भक्कम प्रशिक्षक आहेत, अशा शब्दांत संघाचे संचालक रवि शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली आहे. फ्लेचर यांचे भवितव्य शास्त्री यांच्या अहवालावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या या मतास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-३ असा पराभव स्वीकारल्यानंतर हा दौरा सुरू असतानाच शास्त्री यांची संघाचे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. फ्लेचर व शास्त्री हे दोघेही संघाची धुरा सांभाळत असताना भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-१ अशा फरकानेजिंकली तर ट्वेन्टी२०चा एकमेव सामना गमावला.
कसोटी मालिका गमावल्यानंतर फ्लेचर यांची हकालपट्टी करावी अशी टीका सातत्याने तेली जात होती. या संदर्भात मंडळाने शास्त्री यांच्याकडून अहवाल मागविला होता. शास्त्री यांनी फ्लेचर यांचे कौतुक करीत सांगितले, फ्लेचर हे तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण प्रशिक्षक आहेत. प्रत्येक खेळाडूला ते आपल्या पित्यासमान वाटतात. मी स्वत: त्यांना १९८३ पासून ओळखत आहे. त्यांच्या नेतृत्वशैलीचे कौशल्य मी अगदी जवळून पाहिले आहे. संजय बांगर, भारत अरुण व आर. श्रीधर हे सहायक प्रशिक्षक असल्यामुळे त्यांचे काम अतिशय सुलभ झाले आहे. माझ्याकडे संचालकपद आल्यानंतर फ्लेचर यांनी मला अतिशय बहुमोल सहकार्य केले आहे.
भारतीय संघाविषयी शास्त्री म्हणाले, कसोटी मालिकेत दारुण पराभव स्वीकारल्यानंतरही मनोधैर्य खचून न जाता भारतीय खेळाडूंनी वन डे सामन्यांची मालिका जिंकली आहे. इंग्लंडने स्वत:च्या मैदानावर आजपर्यंत एवढा दारुण पराभव फारसा कधी स्वीकारलेला नाही.
वन डे मालिकेतील विजयामुळे खेळाडूंमध्ये सकारात्मक वृत्ती आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. खेळाडूंवर मी विश्वास ठेवला व त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळेच हा विजय मिळवता आला आहे. ही मालिका सुरू असताना मी प्रत्येक खेळाडूशी समक्ष चर्चा करू शकलो आहे. या सर्व खेळाडूंना मी अनेक वर्षे पाहिले असल्यामुळे आमच्यामध्ये चांगला सुसंवाद होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा