भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय गोलंदाज कुलदीप यादववरील आपलं वक्तव्य आणि त्यामुळे दुखावलेला भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्वीनबाबत मोठं विधान केलं आहे. कुलदीपवरील माझ्या त्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटलं असेल तर मला आनंद आहे की मी ते वक्तव्य केलं, असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. ते इंडियन एक्स्प्रेसच्या ई-अड्डा या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.

रवी शास्त्री म्हणाले, “माझं काम प्रत्येकाला चांगलं वाटेल असं वागणं नाही. माझं काम कोणत्याही अजेंड्याशिवाय तथ्य समोर ठेवणं हे आहे. जर कुलदीपवरील माझ्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटलं असेल तर मला आनंद आहे मी ते वक्तव्य केलं. मी त्याला काहीतरी वेगळं करायला लावलं.”

आर अश्विन काय म्हणाला होता?

भारतीय फिरकीपटू आर. अश्विन ईएसपीएन क्रिकइन्फोला (ESPNcricinfo) दिलेल्या एका मुलाखतीत म्हटला होता, “२०१९ मध्ये सिडनीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रवी शास्त्री कुलदीपला परदेशी मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणारा भारताचा पहिल्या क्रमाकांचा खेळाडू म्हणाले. तेव्हा मला कुणीतरी चिरडून टाकल्यासारखं वाटलं. कुणीतरी मला बसखाली फेकून दिल्यासारखं वाटलं.”

अश्विनच्या या प्रतिक्रियेवर रवी शास्त्री म्हणाले, “अश्विनने त्याला बसखाली फेकून दिल्याबाबतीत काळजी करू नये. कारण मी बसचालकाला २-३ फूट दूरच थांबायला सांगितलंय.”

“अश्विन दुखावला असेल तर मला खूप आनंद आहे”

रवी शास्त्री पुढे म्हणाले, “कुलदीपवर केलेलं ते वक्तव्य केवळ एका तर तरुण गोलंदाजाला प्रोत्साहन देण्यासाठी केलं होतं. सिडनीतील सामन्यात अश्विन खेळला नाही आणि कुलदीपने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे मी कुलदीपला एक संधी दिली हे अगदी रास्त आहे. याने अश्विन दुखावला असेल तर मला खूप आनंद आहे.”

हेही वाचा : IND vs NZ: टॉम लॅथम बाद होताच अश्विनने इतिहास रचला; हरभजन सिंगला टाकले मागे

“प्रशिक्षकाने तुम्हाला आव्हान दिलं तर तुम्ही काय कराल?”

“तुमच्या प्रशिक्षकाने तुम्हाला आव्हान दिलं तर तुम्ही काय कराल? रडत घरी जाल आणि मी परत येणार नाही म्हणाल. एक खेळाडू म्हणून मी ते आव्हान घेईल आणि माझ्याबाबत प्रशिक्षक कसा चुकीचा आहे हे सिद्ध करेल,” असंही रवी शास्त्रींनी नमूद केलं.

Story img Loader