भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार विश्वचषकादरम्यान संपला आहे. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत बीसीसीआयने शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. मात्र बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याच्या मते, रवी शास्त्रीच भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून योग्य आहेत. नाव न घेण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना अधिकाऱ्याने आपलं मत मांडलं आहे.
“रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यात आता चांगला ताळमेळ जमला आहे. आताच्या घडीला सपोर्ट स्टाफ बदलणं योग्य ठरणार नाही. नवीन प्रशिक्षक आल्यास तो नव्या रणनितीने संघ बांधेल आणि यामध्ये पुन्हा वेळ जाण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय संघाची जी घडी बसली आहे ती नवीन प्रशिक्षक येण्यामुळे बिघडू शकते. प्रत्येक खेळाडूचं प्रशिक्षक वर्गासोबत एक नातं तयार झालेलं आहे. त्यामुळे आता नवीन प्रशिक्षकाने सुत्र हाती घेणं योग्य ठरणार नाही.”
अवश्य वाचा – युवराजच्या वडिलांचा यू-टर्न, आता म्हणाले पराभवाला धोनी जबाबदार नाही
३० जुलैपर्यंत बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी या प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र महेला जयवर्धने, टॉम मूडी, गॅरी कर्स्टन यांच्यासारखी नाव सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सनेही भारतीय संघाचत्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचं समजतंय.