वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाने टी-२०, एकदिवसीय,आणि कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. भारताने दुसरा कसोटी सामना एक दिवस राखून जिंकला. त्यामुळे भारतीय संघाला जमैकामध्ये फिरण्यासाठी वेळ मिळाला. भारतीय संघातील खेळाडूंनी जमैकामधील निसर्गसौंदर्य अनुभवले आणि तेथील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही थोडी भ्रमंती केली आणि तेथील निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात वेळ घालवला. त्या क्षणाचा एक फोटोदेखील त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला. पण नेमका त्याच फोटोमुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची नामुष्की ओढवली.

रवी शास्त्री यांनी जमैकातील अँटिग्वाच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटला. तेथील एक पेयपानाचा फोटो त्यांनी पोस्ट केला. त्यात त्यांच्या डाव्या हातात एका पेयाचा ग्लास दिसला. ते पित असलेले पेय हे अत्यंत चवदार आहे, असे त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले. मात्र रवी शास्त्री हे या आधी मद्यपान करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असल्यामुळे सोशल मीडियावर या फोटोवरूनही ते चांगलेच ट्रोल झाले.

नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि त्यांच्यावर टीकादेखील केली.

दरम्यान, रवी शास्त्री यांच्याकडे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. कपिल देव यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून रवी शास्त्री यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर संघासोबत रवी शास्त्री यांच्यावरही जोरदार टीका झाली होती. त्यामुळे त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी निवड होईल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण अखेर रवी शास्त्री यांचे नाव जाहीर करण्यात आले. २०२१ मध्ये भारतात होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम असणार आहेत.

Story img Loader