भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवि शास्त्री व मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याकडेच आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघाची सूत्रे राहावीत असे सांगून ज्येष्ठ क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी या दोघांची पाठराखण केली आहे.
संघासाठी असलेला सर्व स्टाफ आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत तसाच ठेवावा असे सांगून लक्ष्मण म्हणाले, या स्पर्धेसाठी जेमतेम सहाच महिने राहिले असल्यामुळे सध्या तरी त्यामध्ये बदल करणे उचित ठरणार नाही. जर बदल केला गेला तर नवीन व्यक्तींशी सुसंवाद साधण्यासाठी वेळ लागेल व तोपर्यंत विश्वचषक स्पर्धा संपून जाईल. शास्त्री यांच्यासमवेत मी बांगलादेश दौऱ्यावर गेलो होतो. ते अतिशय सकारात्मक वृत्तीचे खेळाडू व संघटक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यांनी एका कसोटीत भारताचे नेतृत्व केले व तो सामनाही भारताने सहज जिंकला होता.
संघाबरोबर असलेले भारत अरुण व आर. श्रीधर यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचा अनुभव आहे. संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची सलामी करण्याची जबाबदारी रोहित शर्मा याच्याकडे दिली पाहिजे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील खेळपट्टी व वातावरण त्याच्या शैलीस अनुकूल आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा