काही महिन्यांपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडले. त्यानंतर रवि शास्त्री आता इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनसोबत नेट्समध्ये सराव करताना दिसले आहेत. विशेष म्हणजे या दोघांसोबत माजी क्रिकेटपटू नासेर हुसैनदेखील होते. या तीन माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या या खेळाडूंनी पुन्हा सामने खेळण्याचा विचार केला की काय? अशी चर्चा रंगली आहे. मात्र, हा व्हिडीओ शास्त्री आणि इतर दोघांच्या कामाचा एक भाग आहे.
प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवि शास्त्रींनी पुन्हा समालोचनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यांसाठी स्काय स्पोर्ट्ससाठी इंग्लंडमध्ये समालोचन करत आहेत. यादरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये शास्त्री गोलंदाजी करताना तर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन फलंदाजी करताना दिसत आहे. या दोघांसोबत इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैनही तिथे उपस्थिती आहेत.
सामन्यातील समालोचनासोबतच स्काय स्पोर्ट्स प्रेक्षकांना तज्ज्ञांकडून वेळोवेळी खेळ समजून घेण्याची संधीही देत असते. याचाच एक भाग म्हणून पीटरसन आणि शास्त्री नेट्समध्ये क्रिकेट खेळताना दिसले. या व्हिडीओमध्ये पीटरसन, एक फलंदाज फिरकी गोलंदाजांचा कसा सामना करू शकतो? हे समजून सांगत आहे. फलंदाजांनी फ्रंट फूट आणि बॅक फूटवर कसे यावे आणि ऑफ साइडला फटके कसे मारावेत, हेदेखील या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.