भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री कायम राहतील याची शक्यता वाढलेली आहे. नवीन प्रशिक्षक निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने, भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून परदेशी उमेदवाराऐवजी भारतीय उमेदवारालाच पसंती दिली जाईल असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातला ताळमेळ पाहता प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच पुनरागमन करतील असं चित्र निर्माण झालं आहे.

“भारतीय संघासाठी आम्ही परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही आहोत. गॅरी कस्टर्न सारख्या दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला आहे, अशा नावांचा आम्ही विचार करु मात्र भारतीय प्रशिक्षक हीच आमची पहिली पसंती राहील. रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे, मग बदल कशाला करायचा? त्यामुळे सध्याच्या घडीला रवी शास्त्री पुनरागमन करतील असं दिसत आहे.” क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर IANS वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक निवडेल.

रवी शास्त्री वगळता रॉबिन सिंह, लालचंद राजपूत यांनीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. सल्लागार समितीमध्ये ३ सदस्य असल्यामुळे अंतिम निवडीदरम्यान सदस्यांमध्ये मतभिन्नता झाली तर समितीचे अध्यक्ष कपिल देव यांचं मन निर्णायक ठरणार आहे. दरम्यान क्रिकेट प्रशासकीय समितीकडून सल्लागार समितीला हिरवा कंदील मिळाल्यामुळे आगामी आठवड्यात प्रशिक्षक निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अवश्य वाचा – माजी फिरकीपटू सुनिल जोशी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

Story img Loader