भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेरीस मिळालं आहे. १६ ऑगस्ट रोजी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड केली. आगामी २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्री यांच्यासोबत करार करण्यात येणार आहे. मात्र मुलाखतीदरम्यान रवी शास्त्री यांनी क्रिकेट सल्लागार समितीकडे मोठी मागणी केल्याची बातमी समोर येते आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीदरम्यान सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रवी शास्त्री यांनी संघ निवडीदरम्यान आपलं मत विचारात घ्यावं अशी मागणी केली आहे. कित्येकवेळा संघनिवडीदरम्यान कर्णधार विराट निवड समितीसोबत आत आणि मी बाहेर बसल्याचंही शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितलं.

“विश्वचषकात मधल्या फळीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला जे खेळाडू हवे होते त्यांची संघात निवड झाली नाही, असं शास्त्री यांना सांगायचं होतं. संघ निवडीदरम्यान प्रशिक्षक आणि इतरांचं मत विचारात घेतलं जात नसलं तरीही शास्त्री यांना संघनिवडीदरम्यान प्रशिक्षकाचं मत विचारात घेतलं जाव असं वाटत आहे.” क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्याने माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

विश्वचषकाच्या संघनिवडीदरम्यान एम.एस.के. प्रसाद यांच्या निवडसमितीने अंबाती रायुडूला वगळून विजय शंकरला संघात संधी दिली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. यानंतर विजय शंकर सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही रायुडूऐवजी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं. निवड समितीच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे रवी शास्त्री यांनी केलेल्या मागणीवर बीसीसीआय काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader