कसोटी क्रिकेट हा खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणारा सर्वोत्तम प्रकार आहे. मात्र पाच सामन्यांची मालिका असू नये, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी दी प्रेस क्लब मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
‘‘दोन कसोटी सामन्यांची मालिका असू नये. कारण त्यात स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एका संघाने सलग तीन सामने कसोटी जिंकले तर त्यानंतरच्या सामन्यात पुनरागमन करणे कठीण जाते. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाला फायदा होतो. त्यांना खेळपट्टय़ांची अचूक जाण असते, त्यानुसार डावपेच आखले जातात. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका हरला म्हणून मी हे म्हणत नाही. पण अशा मालिका खेळाला आणि खेळाडूंना उपयुक्त नाहीत. कोणत्याही दोन संघांतील कसोटी मालिका तीन सामन्यांपुरती मर्यादित असावी,’’ अशी सूचना शास्त्री यांनी केली.
धोनीच्या नेतृत्व क्षमतेबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘इंग्लंडच्या दौऱ्यातील संघ पाहता धोनी हाच कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय होता. वीस बळी घेऊ शकतील असे गोलंदाज संघात नसतील तर कर्णधाराला डावपेच आखणे कठीण जाते. त्यामुळे इंग्लंडमधील ढासळत्या कामगिरीसाठी धोनीला जबाबदार येणार नाही. डंकन फ्लेचर यांच्याशी माझे ऋणानुबंध खूप जुने आहेत. शंभरहून अधिक कसोटी सामन्यांचा प्रशिक्षणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. एखाद्या दौऱ्यातील खराब कामगिरीसाठी त्यांना दोषी ठरवता येणार नाही.’’
जबरदस्त फॉर्मात असलेल्या सुरेश रैनाबाबत आशावादी असल्याचे शास्त्रीने सांगितले. ते म्हणाले, ‘‘रैनाच्या फलंदाजीतील नैपुण्य अफलातून आहे. त्याची फलंदाजी पाहणे आनंददायी असते. तो कसोटी संघात परतावा असे मनापासून वाटते.’’ विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीविषयी शास्त्री म्हणाले, ‘‘विराट संघातील सगळ्यात मेहनती खेळाडू आहे. त्याची फलंदाजी सर्वसमावेशक आहे. इंग्लड दौऱ्यातील अपयशातून तो निश्चित अधिक परिपक्व फलंदाज म्हणून समोर येईल.’’
बीसीसीआय आणि एन.श्रीनिवासन यांच्याशी विशेष सख्य असल्याच्या प्रश्नावर शास्त्री यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ‘‘संघाच्या कामगिरीत सुधारणा आणि सातत्य असावे यासाठी बीसीसीआयने माझी नियुक्ती केली आहे. काही वर्षांपूर्वी बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव होता. त्यावेळी खेळाडूंनी त्यांची भूमिका बीसीसीआयसमोर मांडण्यासाठी माझी निवड केली आहे. माझे सर्वाशी चांगले संबंध आहेत, परंतु माझे उद्दिष्ट क्रिकेट आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा