मेलबर्न : मालिका १-१ अशी बरोबरीत असली, तरी त्यासाठी केवळ भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराच कारणीभूत आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुमारच राहिली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत पुन्हा एकदा या कमकुवत फलंदाजीवर घाव घालून मालिकेत एक पाऊल पुढे राहण्याची भारतालाच अधिक संधी आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
‘‘ऑस्ट्रेलियाची आघाडीच्या फलंदाजांची फळी पाहिली तर, ती आजपर्यंतची सर्वात कमकुवत अशीच आहे. उस्मान ख्वाजा, नेथन मॅकस्वीनी, मार्नस लबूशेन या एकाही आघाडीच्या फलंदाजाला बुमरासमोर आत्मविश्वासाने खेळता आलेले नाही. यामुळे त्यांना कोन्सटाससारख्या किशोरवयीन फलंदाजावर विश्वास दाखवण्याचे धाडस करायला लावले आहे. मधल्या फळीत मिचेल मार्शलाही धावा करता आलेल्या नाहीत. स्टीव्ह स्मिथदेखील केवळ एकाच सामन्यात आत्मविश्वासाने खेळू शकला आहे. या सगळ्याचा फायदा भारतीय गोलंदाज उठवतील’’, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी ; भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या बॉर्डरगावस्कर करंडकाचा चौथा सामना आजपासून
‘‘भारताने मालिकेत राखलेली १-१ ही बरोबरी केवळ बुमरामुळे शक्य झाली आहे. अशा वेळी भारतीय संघावर आक्रमण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने कोन्सटास हा नवा चेहरा निवडला आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. पण, हे कसोटी क्रिकेट आहे. हा अनुभव त्याला भविष्य घडविण्यासाठी खूप फायद्याचा ठरेल’’, असे शास्त्री म्हणाले.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघानेच ऑस्ट्रेलियात येऊन तीन कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताला त्यांच्या जोडीने उभे राहायचे असेल, तर त्यांना सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मालिकेत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही’’, असेही शास्त्री यांनी सांगितले.
‘‘भारतीय संघ येथे जिंकण्यासाठी आला आहे. त्यामुळे केवळ स्पर्धा न करता ऑस्ट्रेलियाला पुन्हा कसे हरवायचे याचा विचार करावा लागेल. त्यांचे २० फलंदाज बाद करण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल आणि तेवढे आक्रमक ते खेळतील. चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसच मालिका कोणत्या दिशेने जाणार हे ठरवेल’’, असेही शास्त्री म्हणाले.