ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला फलंदाजीतल्या अपयशाची चिंता चांगलीच सतावते आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीयेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताची सलामीची जोडी पुरती अपयशी ठरली आहे. 26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे. याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाच्या फलंदाजीविषयी चिंता व्यक्त केली. ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“सलामीच्या जोडीचं अपयश हा आमच्यासाठी मोठा चिंतेचा विषय आहे यात वाद नाही. सलामीच्या जोडीने जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव आहे. कठीण परिस्थीतीमध्येही चांगली कामगिरी करुन दाखवण्याचं कौशल्यही त्यांच्या अंगात आहे. फक्त मैदानात गेल्यावर तुम्ही ते कसं अमलात आणता हाच प्रश्न आहे.” शास्त्रींनी मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्या ढासळलेल्या फॉर्मबद्दल सूचक वक्तव्य केलं.

तिसऱ्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालला संधी मिळणार का असं विचारलं असता शास्त्री म्हणाले, “मयांक एक आश्वासक तरुण खेळाडू आहे. भारत अ संघाकडून खेळत असताना त्याने चांगल्या धावा काढल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे मयांकची कामगिरीही तितकीच चांगली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला संधी देण्याबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल.” रवी शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे मुरली विजय किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एका फलंदाला मयांक अग्रवालसाठी जागा मोकळी करुन संघाबाहेर बसावं लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

अवश्य वाचा – IND vs AUS : टीम इंडीयाच्या मागे दुखापतींचं ग्रहण, रविंद्र जाडेजाचा खांदा दुखावला

Story img Loader