वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर आणि माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांना भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आता माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी उडी घेतली आहे. सुधीर नाईक यांना शिवीगाळ केल्याचा निषेध व्यक्त करत मांजरेकर यांनी रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.
रवी शास्त्री यांनी सुधीर नाईक यांच्यावर टीका करून मर्यादा ओलांडली. त्यांनी आपल्या कृतीतून नाईक यांचे वय आणि माजी क्रिकेटपटूबाबत अनादर दाखवला आहे, असे ट्विट मांजरेकर यांनी केले आहे.

मांजरेकर यांच्यासोबतच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनेही शास्त्रींच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. पराभवाचे खापर खेळपट्टी आणि क्युरेटरवर का फोडायचे? चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या संघाला शास्त्री यांनी दोषी धरायला हवे, असे ट्विटर विनोद कांबळीने केले आहे.

 

वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभा केला. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अजिबात साथ मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेले भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी क्युरेटर आणि माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण सोमवारी समोर आले. नाईक यांनी हे प्रकरण नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातले आहे.