Champions Trophy 2025 Ravi Shastri statement on Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी सर्व आठ देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. गेल्या वेळी २०१७ मध्ये ही स्पर्धा पाकिस्तानी संघाने जिंकली होती आणि त्यावेळी भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण टीम इंडिया पुन्हा एकदा २०१३ प्रमाणे ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेपूर्वी भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी बुमराह आणि टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नाही, तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर बुमराहने चॅम्पियन्स ट्रॉफी न खेळल्यास टीम इंडियाची ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता ३०-३५ टक्क्यांनी कमी होईल, असे म्हटले आहे.

रवी शास्त्री जसप्रीत बुमराहबद्दल काय म्हणाले?

रवी शास्त्री आयसीसी रिव्ह्यूमध्ये म्हणाले, “मला वाटते की ही एक मोठी जोखीम आहे. त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला वाटते की तो इतका मौल्यवान आहे की त्याला अचानक एखाद्या खेळासाठी बोलावले गेले आणि चांगली कामगिरी करण्यास सांगितले तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप असतील. बुमराह लगेच येईल आणि जबरदस्त कामगिरी करेल, असे त्यांना वाटते. जेव्हा तुम्ही दुखापतीतून पुनरागमन करता तेव्हा ते इतके सोपे नसते.”

भारताची जिंकण्याची शक्यता ३०-३५ % कमी होईल –

भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी बुमराह किती महत्त्वाचा आहे, यावरही शास्त्री यांनी भर दिला. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या योजनांना मोठा धक्का बसणार असल्याचे त्याने सांगितले. ते म्हणाले, “बुमराह तंदुरुस्त नसल्यामुळे भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची शक्यता ३०-३५% कमी होईल. पूर्णपणे तंदुरुस्त बुमराह खेळत असताना, तुम्हाला डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या कामगिरीची खात्री असते. तो पूर्णपणे वेगळा खेळ झाला असता.”

२०२४ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहची नुकतीच आयसीसी पुरुष क्रिकेटपटू आणि आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. जसप्रीत बुमराहने भारताच्या टी-२० विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. तथापि, जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत पाठीच्या दुखण्यामुळे तो संघाबाहेर गेला आहे. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची चिंता वाढली आहे.

Story img Loader