भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. आताही त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेटबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. शास्त्री यांच्या मते, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक मोठी स्पर्धा बनली आहे. आयपीएलने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे द्विपक्षीय टी ट्वेंटी क्रिकेटला फारसे महत्त्व राहिलेले नाही. दिवसेंदिवस ते आणखी कमी होत जाईल. अशा परिस्थितीतमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटचे फक्त विश्वचषक खेळवले पाहिजेत. कारण टी ट्वेंटी क्रिकेटच्या द्विपक्षीय मालिका कोणालाच आठवत नाही. शिवाय वर्षभरात आयपीएलसारखी आणखी एखादी स्पर्धा खेळवली गेली पाहिजे.

ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाइटवरील कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री यांनी आपले हे मत मांडले आहे. या चर्चेवेळी त्यांच्यासोबत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी, माजी वेस्ट इंडिज खेळाडू इयान बिशप आणि आकाश चोप्रा देखील उपस्थित होते. या चर्चेमध्ये एका वर्षात दोन आयपीएल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, ‘जगभरात अनेक द्विपक्षीय टी ट्वेंटी सामने खेळवले जात आहेत आणि ते कोणाला आठवतही नाहीत. मलाही नाही आठवत. माझ्या ६ ते ७ वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात मला विश्वचषकाशिवाय एकही द्विपक्षीय टी ट्वेंटी सामना आठवत नाही. मात्र, तुम्ही विश्वचषक जिंकलात तर लोकांच्या लक्षात राहता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर टी ट्वेंटी क्रिकेटच्या द्विपक्षीय मालिकांऐवजी केवळ विश्वचषक खेळवला गेला पाहिजे.

इयान बिशप, आकाश चोप्रा आणि डॅनियल व्हिटोरी यांनीही रवी शास्त्री यांच्या मताशी सहमती दर्शवली. भविष्यात आयपीएल हा एक मोठा ब्रँड बनणार आहे आणि तो वर्षातून दोनदा खेळला जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आपला मुद्दा आणखी पटवून देण्यासाठी शास्त्रींनी फुटबॉलचे उदाहरण दिले. शास्त्री म्हणाले की, ‘टी ट्वेंटी क्रिकेट देखील फुटबॉलसारखे असले पाहिजे. फुटलबॉलप्रमाणे, फ्रँचायझी क्रिकेट बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त विश्वचषक खेळवला गेला पाहिजे. सध्या प्रत्येक देशाची स्वतःची देशांतर्गत फ्रँचायझी टी ट्वेंटी स्पर्धा आहे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यानंतर दर दोन वर्षांनी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.’

रवी शास्त्री, इयान बिशप, आकाश चोप्रा आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या मताचा आयसीसी विचार करणार का? हे भविष्यात स्पष्ट होईल.

Story img Loader