Ravi Shastri’s Statement on T20 World Cup 2024 about India : भारताने नुकतीच एकदिवसीय विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली आहे. विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले. त्या पराभवाचे दु:ख मागे ठेवून भारतीय संघ पुढे सरसावला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे, ज्यामध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन्ही सामन्यात कांगारू संघाचा पराभव केला आहे. हे पाहून भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला २०२४ टी-२० विश्वचषक स्पर्धेचा सर्वात मोठा दावेदार म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत इतर संघांसाठी एक मोठे आव्हान –

पीटीआयशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “मी भारताला लवकरच विश्वचषक जिंकताना पाहत आहे. जरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे इतक्या लवकर होणार नाही, परंतु टी-२० क्रिकेटमध्ये भारत इतर संघांसाठी एक मोठे आव्हान असेल. कारण या फॉरमॅटमध्ये आपल्याकडे अनेक शानदार खेळाडू आहेत. तुम्हाला फक्त त्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण विश्वचषकासारखी गोष्ट तुम्हाला इतक्या सहजासहजी मिळत नाही, सचिनसारख्या खेळाडूला यासाठी सहा विश्वचषकांची प्रतीक्षा करावी लागली होती.”

वर्ल्डकपसाठी खूप मेहनत करावी लागेल –

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, “तुम्ही विश्वचषक इतक्या सहजासहजी जिंकू शकत नाही, तुम्हाला तो जिंकण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. तसेच, वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या मंचावर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. एकदा तुम्ही फायनलमध्ये पोहोचलात की, तुम्ही आतापर्यंत स्पर्धेत काय केले आहे, याने काही फरक पडत नाही. तुमचा खेळ तुम्हाला चॅम्पियन बनवतो.” रवी शास्त्री म्हणाले की, आम्ही विश्वचषक जिंकला नसला तरी आमचा संघ खूप मजबूत आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2023: त्रिपुराचा गतविजेता सौराष्ट्र संघाला दे धक्का! १४८ धावांनी उडवला धुव्वा

२०२४ पूर्वी चांगला संघ तयार होऊ शकतो –

रवी शास्त्री पुढे म्हणाले की २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडे अनेक युवा खेळाडू आहेत, जे विश्वचषकासारख्या व्यासपीठावर चांगली कामगिरी करू शकतात. जून २०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. रवी शास्त्री म्हणाले की, “एकदिवसीय विश्वचषक जिंकणे इतके सोपे नाही. कारण तुम्हाला संघाची पुनर्बांधणी करावी लागेल, परंतु टी-२० मध्ये सध्या चांगला संघ आहे. विश्वचषक खेळू शकणारे अनेक नामवंत खेळाडू याआधीच पुढे आले आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri said that i see india winning the t20 world cup 2024 soon vbm