भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गुरुवारपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत, टीम इंडियाचे टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट पणाला लागणार आहे. भारतामध्ये मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला मायदेशातील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्या अगोदर माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीने मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते भारतीय संघाचे नशीब एका खेळाडूच्या हाती असणार आहे. जो भारतीय संघासाठी महत्वाचे भूमिका बजावेल.
शास्त्रींच्या मार्गदर्शानाखाली भारताने ऑस्ट्रेलियात एका पाठोपाठ दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यांना वाटते की रविचंद्रन अश्विनचा फॉर्म या मालिकेत भारताचे भवितव्य ठरवण्यात मोठी भूमिका बजावेल. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या संवादादरम्यान बोलताना ते म्हणाले की, अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारत मालिका जिंकणार हे निश्चित आहे.
रवी शास्त्री म्हणाले, “मला नाही वाटत अश्विनने जास्त प्लॅनिंग करावे. तो आपल्या योजनांवर ठाम राहण्यासाठी पुरेसा चांगला आहे. कारण तो येथे खरोखरच महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा फॉर्म मालिकेची दिशा ठरवू शकतो. अश्विन एक पॅकेज म्हणून समोक आला आहे, तो तुमच्यासाठी महत्त्वाचा धावाही काढू शकतो.”
शास्त्री पुढे म्हणाले “जर अश्विनने आग ओकायला सुरुवात केली, तर मालिकेचा निकाल निश्चित होऊ शकतो. तो बर्याच परिस्थितीत जागतिक दर्जाचा आहे, पण भारतीय परिस्थितीत तो प्राणघातक आहे. जर चेंडू वळायला लागला, तर तो सर्वात जास्त त्रास देईल. त्यामुळे अश्विनने जास्त विचार करावा आणि खूप काही करून पाहावे, असे वाटत नाही. फक्त त्याला तिथे ठेवा आणि बाकीचे खेळपट्टीला करू द्या. तसे ही ती भारतात बरेच काही करते.”
हेही वाचा – Shahid Afridi: शाहीन शाह आफ्रिदीशी मुलीचे लग्न झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी संतापला, जाणून घ्या काय आहे प्रकरण
माजी प्रशिक्षक म्हणाले, “तिसर्या फिरकीपटूचा प्रश्न आहे, तर मला कुलदीपला सरळ खेळताना बघायला आवडेल. जडेजा आणि अक्षर हे सारखेच गोलंदाज आहेत. कुलदीप वेगळा आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी नाणेफेक हरलात, तर तुम्हाला कोणीतरी हवा आहे, जो कोणी स्विंग करत असेल आणि वर्चस्व मिळवू शकेल. पहिल्या दिवशी तो कुलदीप असेल.”