Ravi Shastri says Shaheen Shah Afridi is no Wasim Akram: काल (शनिवार) १४ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय विश्वचषकातील १२वा सामना खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात एकीकडे भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना, दुसरीकडे पाकिस्तानचे गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही फ्लॉप ठरले. त्यामुळे त्यांना या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीचा कणा म्हटल्या जाणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने भलेही २ विकेट्स घेतल्या असतील, पण त्याने ६ षटकात ३६ धावा दिल्या. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना रवी शास्त्री शाहीन आफ्रिदीबद्दल जे काही बोलले ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवी शास्त्री शाहीन आफ्रिदीबद्दल का म्हणाले?
भारत-पाक सामन्यादरम्यान लाइव्ह कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले, “तो एक चांगला गोलंदाज आहे, तो नवीन चेंडूवर विकेट घेऊ शकतो. पण तुम्हाला हे मान्य करावे लागेल, जर नसीम शाह खेळत नसेल आणि पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचा दर्जा असा असेल, तर शाहीन शाह आफ्रिदी कोणी वसीम अक्रम नाही. त्यात फारशी अतिशयोक्ती नसावी. त्याला एवढा प्रचार करण्याची गरज नाही.”
शाहीनने सामन्यात घेतल्या दोन विकेट्स –
या विश्वचषकात आतापर्यंत शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या संघाकडून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने दोन बळी घेतले असले तरी या सामन्यात तो थोडा महागच ठरला. या सामन्यात आफ्रिदीने शुबमन गिल आणि रोहित शर्माला बाद केले.
हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्मा चौकार-षटकार मारत असताना, अमिताभ बच्चन शोधत होते रितिकाला, ट्विट करून सांगितले कारण
भारताविरुद्ध पाकिस्तानला आठव्यांदा पत्कारावा लागला पराभव –
टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ मध्ये पाकिस्तानचा विजयरथ रोखला होता. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ अजिंक्य ठरला होता, मात्र जुन्या रेकॉर्डनुसार यावेळी पुन्हा पाकिस्तानला भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताने पाकिस्तानचा पराभव करून वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. आतापर्यंत टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात आठ वेळा पराभूत केले आहे. सध्या टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.