कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर आता इंग्लंडशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन हात करण्यासाठी उतरताना भारतीय संघाच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी नियुक्त करून प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे. पण शास्त्री यांनी ‘‘माझी भूमिका सूत्रधाराची असली तरी डंकन फ्लेचर हेच संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील,’’ असे मुत्सद्दीपणे सांगितले आहे.
‘‘संघाच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे माझे काम असेल. सर्व जण मला घडामोडींची माहिती देतील, पण संघाचे मुख्य प्रशिक्षक हे फ्लेचरच असतील. त्यांच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारची गदा आणण्यात आलेली नाही. संजय बांगर, बी.अरुण आणि आर. श्रीधर हे त्यांच्यासाठी मदतनीस म्हणून काम पाहतील. आम्ही सध्याच्या घडामोडींबाबत चर्चा केली आहे. यापुढे काय आणि कसे करता येईल, यावरही विचारविनिमय केले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघामध्ये सुसंवाद साधला आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
सोमवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या वेळी त्यांना कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरावा लागेल. संघाच्या कसोटी पराभवाबद्दल शास्त्री म्हणाले की, या दौऱ्यामध्ये मी आतापर्यंतचा विदेशातील सर्वोत्तम विजय पाहिला. पण त्या विजयानंतर भारतीय संघाला आघाडी टिकवता आली नाही. त्यानंतरचे तिन्ही सामने जिंकत इंग्लंडने मालिका ३-१ अशी जिंकली. या दौऱ्यात मला सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे खेळाडूंनी एकासारख्याच चुका केल्या. चुका सर्वाकडून होतात, पण त्यांनी खेळामध्ये बदल करायला हवा होता, ते त्यांच्याकडून पाहायला मिळाले नाही.

Story img Loader