आशिया चषक २०२२ मध्ये ( ६ सप्टेंबर ) मंगळवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यापूर्वी पाकिस्ताननेही भारतीय संघाला धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. संघाच्या या दयनीय परिस्थितीबाबात भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी निवड समितीवर संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली आहे. यावरून रवी शास्त्री यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला खडेबोल सुनावले आहेत. “आशिया चषक स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापन आणि निवड समिती केवळ ४ वेगवान गोलंदाज कसे निवडतात? तसेच मोहम्मद शमीसारख्या अनुभवी, प्रतिभावान आणि प्रभावी खेळाडूला तुम्ही घरी कसे बसवू शकता. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचा निर्णय डोके चक्रावून टाकणार आहे,” असेही शास्त्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दोन्ही सामन्यात फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. मात्र, गोलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात हार पत्कारावी लागली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह या तिघांनी धावा दिल्या. ते धावगतील लगाम घालू शकले नाही.

३१ वर्षीय मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या इंग्लड विरोधातील एकदिवसीय मालिकेत दमदार गोलंदाजीचा नमुना सर्वांसमोर ठेवला होता. तसेच, त्याने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात संघाकडून चांगली कामगिरी केली होती. मात्र, मागील विश्वचषकानंतर शमीने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला नाही. पण, आशिया चषक सारख्या मोठ्या स्पर्धेत शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाची भारतीय संघाला उणीव भासली.

Story img Loader