भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये संघासोबत मेंटॉर म्हणून जाणार आहे. संघाने २००७ नंतर आतापर्यंत कधीच टी २० विश्वचषक जिंकलेला नाही. धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने २००७ साली खेळवण्यात आलेल्या टी २० विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं. मात्र धोनी केवळ या स्पर्धेपुरताच संघासोबत असणार आहे. धोनीला सपोर्टिंग स्टाफ म्हणून भारतीय संघासोबत दिर्घ काळ राहण्याची इच्छा नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलीने हा खुलासा केलाय. तसेच भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी २० विश्वचषकानंतर संपत आहे. विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोर ते १४ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. म्हणजेच शास्त्री हे केवळ दोन महिन्यांसाठी भारतीय संघासोबत आहेत.
नक्की वाचा >> Ind vs Eng : “त्या गुन्ह्यासाठी रवी शास्त्री आणि कोहलीला अटक करा”; संतप्त भारतीयांची मागणी
सौरव गांगुलीने टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली. धोनी केवळ टी २० विश्वचषक स्पर्धेपुरता संघासोबत असणार आहे. धोनीने यापूर्वीच बीसीसीआयला यासंदर्भातील माहिती दिल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. भारताने आतापर्यंत सर्व टी २० विश्वचषक स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वच आयसीसी स्पर्धा जिंकल्यात. २०१३ नंतर भारताला एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताला शेवटी स्पर्धा ही धोनीच्या नेतृत्वाखालीच जिंकता आलेली. गांगुलीने मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार अनेक देश आपल्या वरिष्ठ, माजी खेळाडूंची मदत घेतात. त्यामुळे संघाला फार फायदा होतो, असंही गांगुलीने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “IPL साठी विराट असं करणं शक्यच नाही”; सामना रद्द झाल्यानंतर त्या एका शब्दामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डावर संतापले भारतीय चाहते
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार टी २० विश्वचषकानंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील म्हणजेच टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा आहे. विराटला फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करायंच असल्याने तो कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येतंय. म्हणजेच टी २० विश्वचषकानंतर संपूर्ण भारतीय संघच बदललेल्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. प्रशिक्षक रवि शास्त्रींसोबतच कोहलीही पद सोडणार असल्याने भारताला ऑन आणि ऑफ द फिल्ड नवीन नेतृत्व मिळणार आहे. रोहित शर्माकडे टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नेतृत्व दिलं जाण्याची चर्चा आहे. मात्र बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रोहित शिवाय इतर कोणताही खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत नाहीय.
टी २० विश्वचषक २०२२ मध्येही होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा भरवली जाणार आहे. तसेच आयपीएलमध्येही दोन संघांची भर पडणार असल्याने भारतीय खेळाडू खेळणार असणाऱ्या टी २० सामन्यांची संख्या वाढणार आहे. आयपीएलमध्ये नवीन दोन संघ येणार असल्याने स्पर्धेतील सामने, भारतीय आणि परदेशी खेळाडूंची मागणीही वाढणार आहे. यामुळे बीसीसीआयची घसघशीत कमाई होणार आहे.