भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आता आपल्या जुन्या शैलीत परत येऊ शकतात. तब्बल ७ वर्षे टीम इंडियाशी संलग्न राहिल्यानंतर रवी शास्त्री पुन्हा एकदा कॉमेंट्री पॅनलमध्ये परतत आहेत. रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत समालोचन करताना दिसतील. स्टार स्पोर्ट्स इंडियाने रवी शास्त्रींबद्दल एक प्रोमो देखील जारी केला आहे, ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना शास्त्रींनी समालोचन पॅनेलमध्ये परत येत असल्याचे संकेत दिले आहेत.

स्टार स्पोर्ट्स इंडियाने सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये रवी शास्त्री किचनमध्ये उभे राहून काहीतरी स्वादिष्ट अन्न चाखताना दिसत आहेत. ‘काहीतरी शिजत आहे.. मला सांगा की रवी शास्त्री येथे का आले आहेत आणि माहितीसाठी संपर्कात रहा’, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आल आहे. नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषकानंतर शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता आणि ते आता आपल्या जुन्या अवतारात परत येण्यासाठी उत्सुक आहे.

हेही वाचा – भारत-आफ्रिका कसोटी मालिका : शार्दूल, रहाणेमध्ये चुरस

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी तीन सामने खेळवले जातील. रवी शास्त्रीचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन ही क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. दिग्गज प्रशिक्षक होण्यापूर्वी रवी शास्त्री त्यांच्या समालोचनासाठी जगभरात प्रसिद्ध होते. भारताचा टी-२० विश्वचषक २००७ विजय, युवराज सिंगचे सहा षटकार, वानखेडे स्टेडियमवर धोनीने मारलेला विश्वचषक विजयी षटकार यासह अनेक ऐतिहासिक प्रसंगांवर त्यांनी समालोचन केले आहे. गेली अनेक वर्षे ते टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिले, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांची कमतरता भारतीय चाहत्यांना नक्कीच खटकत होती.