भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघांनी जवळपास पूर्ण केली आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान खेळपट्टीची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे खेळपट्टी हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अशात आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळपट्टीबाबत एक मागणी केली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चेने जोर धरला आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले, “मला पहिल्या दिवसापासून चेंडू वळताना बघायचा आहे. तुम्ही एका अशा माणसाशी बोलत आहात, ज्याने ऑस्ट्रेलियाचा दोनदा दौरा केला आहे. नाणेफेक हरलो तर काही फरक पडत नाही, पण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले, तर चेंडू वळताना बघायचा आहे. तुम्ही घरी खेळत आहात त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या.” रवी शास्त्रीने केलेल्या या मागणीने ऑस्ट्रेलियन संघाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे ऑलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिली म्हणाला होता की, भारताने ‘योग्य’ खेळपट्ट्या बनवल्यास कांगारू संघ ही मालिका जिंकू शकतो. हिली म्हणाला, “मला वाटते की त्यांनी योग्य विकेट्स तयार केल्या, ज्यावर फलंदाजी करणे चांगले आहे आणि सामन्याच्या शेवटी अधिक फिरकीच्या खेळपट्ट्या तयार केल्या तर आम्ही (ऑस्ट्रेलिया) जिंकू.”
हिलीचे देशबांधव ग्रेग चॅपल यांनी असहमती व्यक्त करताना म्हणाले खेळपट्टीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार खेळपट्टी क्युरेटरशिवाय कोणालाही नाही. स्टार स्पोर्ट्सवर चॅपल म्हणाले, “खेळपट्टीबद्दल खूप चर्चा होत आहे. माझ्या मते हा निर्णय घेण्याचा अधिकार खेळपट्टी क्युरेटर आणि ग्राउंडकीपर्सशिवाय कोणालाही नाही. मग तो खेळाडू असो, प्रशिक्षक असो किंवा संघ व्यवस्थापक असो.”
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.