बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती स्वागतार्ह आहे. त्यांची उपस्थितीच संघातील खेळाडूंना आधार देणारी आहे, असे मत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
भारतीय संघाची परदेशातील ढासळती कामगिरी रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आणि विश्वचषकादरम्यान रवी शास्त्री यांची संघसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विश्वचषकासह मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची खुर्ची रिकामी झाली. प्रशिक्षक कोण याविषयी ६ जून रोजी बीसीसीआयतर्फे औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाचा बांगलादेश दौरा सुरू होणार असल्याने रवी शास्त्री हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
‘शास्त्री जबाबदारीपासून कधीही पळ काढत नाहीत. परिस्थिती प्रतिकूल असतानाही ते खंबीर असतात. इतिहास उगाळत बसण्यापेक्षा भविष्याकडे पाहणे त्यांना आवडते. त्यांची विचार करण्याची पद्धत साधी सरळ आहे. भारतीय संघात आता युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास बिंबवण्याकरिता शास्त्री यांच्यापेक्षा दुसरी चांगली व्यक्ती नाही. ते अधिकारवाणीने बोलतात आणि सगळेच खेळाडू त्यांच्या मताचा आदर करतात. त्याच्या असण्यानेच खेळाडूंना पाठीशी वडीलधारी व्यक्ती असल्यासारखे वाटते,’ असे कोहलीने सांगितले.
रवी शास्त्री यांच्या भूमिकेविषयी विचारले असता कोहली म्हणतो, ते प्रशिक्षक असोत किंवा सल्लागार, ते महत्त्वाचे नाही. ते संघासोबत आहेत, ही गोष्टच पुरेशी आहे. शास्त्री यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळेच कारकीर्दीत धावांसाठी झगडण्याच्या कालखंडातून बाहेर पडू शकलो. उजवी यष्टी प्रमाण मानून फलंदाजी करण्यापेक्षा क्रीझमध्ये स्टम्प्सच्या समोर उभं राहण्याचा सल्ला शास्त्री यांनी मला दिला. इंग्लंडमध्ये मी त्यांचा सल्ला मानला नाही. ऑस्ट्रेलियात त्यांनी सांगितल्याप्रमाणे तंत्रात बदल केला आणि पुन्हा एकदा धावा होऊ लागल्या. कठीण कालखंडातही ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.’

Story img Loader