Jasprit Bumrah Comeback: भारतीय संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता लवकरच संघात दिसू शकतो. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला बुमराह आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. ऑगस्टमध्ये भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या मालिकेतून बुमराह पुनरागमन करू शकतो. दरम्यान, आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुमराहच्या पुनरागमनाबाबत भारतीय संघाला सतर्क केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत रवी शास्त्रींच्या मनात साशंकता आहे. वास्तविक विश्वचषकापूर्वी जस्सी टीम इंडियात पुनरागमन करेल, असे मानले जात होते. मात्र, त्याच्या पुनरागमनाबाबत बीसीसीआयकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. माहितीसाठी की, जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून एकही सामना खेळलेला नाही. वास्तविक बुमराहला पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. या कारणास्तव, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२३, आयपीएल २०२३ आणि टी२० वर्ल्ड कप २०२२चा देखील भाग नव्हता.
जसप्रीतच्या पुनरागमनाची घाई करू नये – रवी शास्त्री
मात्र, यादरम्यान टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. किंबहुना, ‘जस्सीच्या पुनरागमनाची घाई महागात पडू शकते’, असे त्याचे म्हणणे आहे. तसेच, “जर त्याचे पुनरागमन घाईत झाले तर चार महिन्यांनंतर या खेळाडूला दुखापतीमुळे पुन्हा संघाबाहेर जावे लागू शकते, कारण त्याची दुखापत पुन्हा उफाळून येईल”, असे त्यांचे मत आहे.
‘द-विक’ या मीडिया हाऊसशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “बुमराह हा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण जर तुम्ही विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याला संघात घेण्याची घाई केली तर पुढच्या काळात तुम्हाला तो शाहीन आफ्रिदीसारखा संघाबाहेर दिसेल. कारण चार महिन्यांनंतर पुन्हा वर्ल्डकप आहे आणि त्यातून तो बाहेर पडेल पण त्याच्या करिअरवर देखील परिणाम होईल. म्हणून, आपण याबद्दल खूप काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.”
शास्त्री बुमराहनंतर पुढे हार्दिक पांड्याविषयी बोलले. वन डे आणि टी२० फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, “वास्तविक हार्दिकचे शरीर कसोटी क्रिकेटला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे विश्वचषकानंतर मला वाटते की त्याने झटपट क्रिकेट म्हणजेच व्हाईटबॉलमध्ये कर्णधारपद स्वीकारावे लागेल. मात्र, विश्वचषकात रोहितने भारताचे नेतृत्व करावे, यात शंका नाही.”
तुमच्याकडे शमी आणि सिराजसह अनुभवी गोलंदाज आधीच आहेत- रवी शास्त्री
एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतातच होणार आहे. याविषयी रवी शास्त्री म्हणाले की, “मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला वेगवान गोलंदाजीचा अनुभव आहे असे मला वाटते. तुम्हाला भारतात वेगवान गोलंदाजांची गरज नाही. येथे तुम्हाला फिरकीचा विचार करावा लागेल. जडेजा आणि अक्षर व्यतिरिक्त, तुमच्याकडे चहल, कुलदीप आणि रवी बिश्नोई हे लेग-स्पिनर आहेत. त्यामुळे भारताच्या गोलंदाजी भक्कम आहे.”