Ravichandran Ashwin and Ravindra Jadeja break Australia’s McGrath Gillespie record: भारतीय फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात ४८६ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर या जोडीने सर्वाधिक बळी घेणाऱ्या जोडींच्या यादीत ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पी यांना मागे टाकले आहे. अशा प्रकारे भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन जोडीला मागे टाकले आहे.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला –
रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीत ५ बळी घेतले होते, तर रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने ८ खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रविचंद्रन अश्विनने कसोटीत ३३व्यांदा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. तसेच या ऑफस्पिनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा आकडा देखील पार केला.
ग्लेन मॅकग्रा- जेसन गिलेस्पी या ऑस्ट्रेलियन जोडीला टाकले मागे –
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन जोडी ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पीच्या नावावर होता. मॅकग्रा आणि गिलेस्पी जोडीने क्रिकेटच्या कसोटी फॉरमॅटमध्ये जोडी ४८४ विकेट घेतल्या आहेत. या ४८४ विकेट्समध्ये मॅकग्राच्या नावावर २७४विकेट आहेत, तर गिलेस्पीच्या नावावर २१०विकेट आहेत. पण आता अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुढे गेली आहे. अश्विन आणि जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे यजमान वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात अवघ्या १५० धावांवर गारद झाला. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना १-१ विकेट मिळाली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १५० धावांवर गारद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ३० आणि यशस्वी जैस्वाल ४० धावांवर खेळत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ अजूनही पहिल्या डावात ७० धावांनी मागे आहेत.