वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार शतक आणि डावातील पाच बळींच्या जोरावर रविचंद्रन अश्विनने जागतिक कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कोलकाता कसोटीतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर अश्विनने शाकिब उल हसन आणि जॅक कॅलिस यांना मागे टाकत अव्वल स्थानी कब्जा केला. शतकासह फलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनने १८ स्थानांनी आगेकूच करत ४५वे स्थान गाठले आहे. गोलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी सुधारणा करत तो सहाव्या स्थानी स्थिरावला आहे. भारताविरुद्ध सहा बळी घेणाऱ्या शेन शिलिंगफोर्डने क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल वीसमध्ये प्रवेश केला आहे. पदार्पणातच शतकी खेळी साकारणारा रोहित शर्मा ६३व्या स्थानी आहे. पहिल्याच सामन्यात ९ बळी टिपणारा मोहम्मद शामी ५३व्या स्थानी आहे.