Ravichandran Ashwin breaks Bhagwat Chandrasekhar’s record : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत १-१अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली. मात्र, दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बॅझबॉलवर मात केली. या सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रनने ३ विकेट्स घेत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑली पोपला बाद करुन एक मोठा पराक्रम केला. तो आता भारताकडून इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने भागवत चंद्रशेखर यांचा विक्रम मोडला आहे. चंद्रशेखर यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ९५ विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे ९२ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी आणि कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी इंग्लंडविरुद्ध ८५-८५ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
९७ आर अश्विन
९५ बीएस चंद्रशेखर
९२ अनिल कुंबळे
८५ बीएस बेदी/कपिल देव
६७ इशांत शर्मा</p>
हेही वाचा – IND vs ENG : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी उडवला धुव्वा, मालिकेत १-१ ने साधली बरोबरी
एका विकेटमुळे कसोटीत पाचशे विकेट्स घेण्याची संधी हुकली –
या सामन्यात रविचंद्रन अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पाचशे विकेट्स पूर्ण करण्याची संधा होती. मात्र, तो आता एक पाऊल दूर राहिला आहे. रविचंद्रन अश्विनने २०११ मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय फिरकी गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा राहिला आहे. त्याने टीम इंडियासाठी ९७ कसोटी सामन्यात ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात १५६ आणि टी-२० सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – India vs England : ‘या’ पाच कारणांमुळे भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला चारली धूळ
सामन्याबद्दल बोलायचे, तर भारताने पहिल्या डावात जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात शुबमनच्या शतकी खेळीमुळे २५५ धावा केल्या. त्याचबरोबर इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २९२ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने १०६ धावांनी विजय नोंदवला. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७३ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर पहिल्या डावातही त्याने ७६ धावांचे योगदान दिले होते.