पाऊस आणि अंधुक प्रकाशाने कोलकाता कसोटीत भारतापासून विजयाची संधी हिरावून घेतली. मात्र नागपूर कसोटीत भारताने आपल्या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. एक डाव २३९ धावांनी विजय मिळवत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या कसोटीत भारताने पहिल्या डावात श्रीलंकेनं दिलेलं आव्हान पार करत ४०५ धावांची आघाडी घेतली.

या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात एक गडी गमावला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारत डावाने विजय मिळवणार हे जवळपास निश्चीत झालं होतं. अपेक्षेप्रमाणे चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ कोलमडला. पहिल्या सत्रापर्यंत श्रीलंकेचे ८ गडी माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर उर्वरित दोन गड्यांना माघारी धाडत भारताने कसोटीवर आपली मोहोर उमटवली.

विराट कोहलीचं द्विशतक आणि रविचंद्रन आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेले ३०० बळी हे या कसोटीतले महत्वाचे मुद्दे ठरले. चौथ्या दिवसाच्या खेळात भारताने ८ विक्रमांची नोंद केली.

० – रविचंद्रन आश्विनने ५४ डावांमध्ये ३०० बळींचा टप्पा गाठला आहे. आश्विनने डेनिस लिलींचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी एकाही खेळाडूने इतक्या कमी डावांमध्ये हा विक्रम केलेला नाहीये.

३०० बळींचा टप्पा ओलांडणारे इतर गोलंदाज –

डेनिल लिली – ५६ डाव
मुथय्या मुरलीधरन – ५८ डाव
रिचर्ड हेडली – ६१ डाव
माल्कम मार्शल – ६१ डाव
डेल स्टेन – ६१ डाव

१ – भारताने सर्वात मोठा विजय मिळवण्याच्या आपल्याच विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी भारताने बांगलादेशलाही मिरपूर कसोटीत एक डाव २३९ धावांनी पराभूत केलं होतं.

१ – एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सर्वाधीक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आश्विन-कोहली जोडी पहिल्या स्थानावर. या यादीतील इतर गोलंदाज-कर्णधारांच्या यादीवर एक नजर टाकूया….

१८१ – (रविचंद्रन आश्विन-कोहली)
१७९ – (अनिल कुंबळे-मोहम्मद अझरुद्दीन)
१७७ –(हरभजन सिंह-सौरव गांगुली)
१७२- (कपिल देव-सुनिल गावसकर)

३ – सलग ३ वर्षांच्या कालावधीत ५० पेक्षा जास्त बळी घेणारा रविचंद्रन आश्विन हा तिसरा गोलंदाज ठरला. याआधी शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन या फिरकीपटूंना ही किमया साधता आलेली आहे.

४ – कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत १०० धावसंख्येच्या आत निम्मा संघ बाद होण्याची श्रीलंकेची ही चौथी वेळ ठरली.

३२ – २०१७ या वर्षात भारतीय संघाने आतापर्यंत ३२ सामने जिंकलेले आहेत. या विजयासह भारताने मागच्या वर्षी आपलाच ३१ विजयांचा विक्रम मोडीत काढला आहे. एका वर्षात सर्वाधीक विजय मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर अबाधित आहे. २००३ साली ऑस्ट्रेलियाने ३८ सामने जिंकले होते.

१०० – कसोटी क्रिकेटमधला हा श्रीलंकेचा शंभरावा पराभव ठरला.

५०० – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविचंद्रन आश्विनने ५०० वा बळी टिपला. असा पराक्रम करणारा आश्विन सहावा भारतीय गोलंदाज ठरला.

Story img Loader