Ravichandran Ashwin 5 Wickets: आपल्या फिरकीच्या तालावर बड्या बड्या फलंदाजांना नाचवणाऱ्या रवींचंद्रन अश्विनने १०० व्या कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ३६ व्यांदा पाच विकेट्स घेतले आहेत. याचसोबत तो भारतासाठी सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. १०० व्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या शेन वॉर्न, अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या खास क्लबमध्ये अश्विन सामील झाला आहे. त्याने बेन फोक्सला क्लीन बोल्ड करत या १०० व्या कसोटी सामन्यातील आपली पाचवी विकेट मिळवली आहे.
रविचंद्रन अश्विनच्या या शंभराव्या कसोटीसाठी त्याचे कुटुंबीय ही धरमशालामधील स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी ५ विकेट घेतल्यानंतर त्याच्या २ मुली आणि पत्नी प्रिती अश्विन यांनी त्याला जागेवर उभे राहत शुभेच्छा दिल्या.
अश्विनने इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाल्यापासूनच आपल्या फिरकीची जादू दाखवायला सुरूवात केली. अश्विनने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट दुसऱ्या डावात अश्विनच्या चलाख गोलंदाजीपुढे लवकर बाद झाला. झॅक क्रॉली एकही धाव न घेता ड्रेसिंग रुमकडे परतला. अश्विनने दिवसाची तिसरी विकेट मिळवत इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोपला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले.
त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टोने आक्रमक खेळ करत अश्विनविरुद्ध दमदार षटकारांची मालिका ठोकली.पण कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इंग्लंडने बेअरस्टोला आऊट केले. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने उत्कृष्ट चेंडू टाकत बेन स्टोक्सची भन्नाट विकेट घेतली. अश्विनने लंट ब्रेकपूर्वी फक्त दोन चेंडूत स्टोक्सची विकेट घेतली.बेन स्टोक्सनंतर अश्विनने बेन फोक्सलाही क्लीन बोल्ड करत आपले ५ विकेट्स पूर्ण केले. या पाचव्या कसोटीत अश्विनने आतापर्यंत ९ विकेट्स घेतल्या आहेत.