R Ashwin Welcomes India Video: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील गाबा कसोटी अनिर्णित राहिली आणि टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याची शक्यताही कायम राहिली. पण यादरम्यान भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सामन्यानंतर अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणेदरम्यान, त्यांनी सांगितले होते की भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा त्याचा अखेरचा दिवस आहे आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तो मायदेशात परतला आहे. ज्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहे.
अश्विन आता मायदेशात पोहोचला असून चेन्नई विमानतळावरील त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. चेन्नई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी गर्दी होती, याचबरोबर विमानतळावर त्याची पत्नी आणि दोन मुलीही पोहोचल्या होत्या. ज्याचा व्हीडिओ पाहायला मिळत आहे. यानंतर अश्विनच्या चेन्नईमधील घराजवळ चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्याच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
ब्रिस्बेनमधील सामना संपल्यानंतरच अश्विन भारतासाठी रवाना झाला. यानंतर प्रदीर्घ प्रवासानंतर तो गुरुवार १९ डिसेंबरला सकाळी चेन्नई विमानतळावर उतरला. त्याची पत्नी आणि मुली त्याला घेण्यासाठी आल्या होत्या. अश्विन विमानतळाबाहेर येताच मीडियाची गर्दी पाहायला मिळाली. यानंचतर अश्विन काळ्या रंगाच्या व्हॉल्वोमध्ये बसून घराकडे निघाला.
हेही वाचा – R Ashwin Net Worth: ९ कोटींचं घर, मीडिया कंपनी, लग्झरी कार…, १०० कोटींपेक्षा जास्त आहे अश्विनची एकूण संपत्ती
अश्विनच्या स्वागतासाठी त्याच्या घरी विशेष तयारी करण्यात आली होती. सोसायटीतील लोक, आई-वडील, मित्रपरिवार आधीच वाट पाहत होते. अश्विनला हार घालत, वाजत गाजत त्याच्या राहत्या घरी त्याचं स्वागत करण्यात आलं. अश्विन गाडीतून बाहेर येताच त्याचे वडील घराबाहेर आले आणि त्याला पाहताच त्यांनी मिठी मारली. त्याची आई खूपच भावूक दिसत होती आणि लेकाला मिठी मारताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. सोसायटीतील लोकांनी त्याला हार घालून त्याचं स्वागत केलं. यावेळी काही चाहतेही उपस्थित होते, त्यांनी त्याचा ऑटोग्राफ घेतला.
रवीचंद्रन अश्विनने १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला निवृत्ती जाहीर करत पूर्णविराम दिला. अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केली, ज्यावर अनेक दिग्गजांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.