Ravichandran Ashwin World Record with 6 Wickets IND vs BAN: रविचंद्रन अश्विनच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चौथ्या दिवसाची सुरुवात चार गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावांच्या आघाडीसह केली आणि पहिल्या सत्रात ७६ धावांची भर घालून उर्वरित सहा विकेट गमावल्या. भारताच्या विजयात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​महत्त्वाचे योगदान होते. अश्विनने १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे, जी आजवर कोणालाच करता आलेली नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू अश्विनने चेन्नईतील घरच्या मैदानावर पहिल्या डावात १३३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांची प्रभावी शतकी खेळी केली. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे सहावे शतक ठरले. मात्र, पहिल्या डावात त्याला एकही विकेट घेता आली नाही. अश्विनने दुस-या डावात फलंदाजी केली नाही, पण गोलंदाजीत एकच खळबळ उडवून दिली. अश्विनने एकट्याने बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला.

हेही वाचा – IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

रविचंद्रन अश्विनने ६ विकेट्स घेत केला वर्ल्ड रेकॉर्ड

३८ वर्षीय फिरकीपटू अश्विनने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्याने ८९८ धावांत सहा विकेट घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये ३७ व्यांदा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. यासह अश्विनने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

१४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अश्विन आता पहिला खेळाडू बनला आहे ज्याने एकाच मैदानावर शतक झळकावण्याबरोबरच त्याच सामन्यात ५ विकेट्सही घेतले आहेत. एकदा नव्हे तर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अश्विनने हा पराक्रम दोनदा केला. यापूर्वी, २०२१ मध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शतक (१०६) झळकावण्याबरोबरच अश्विनने ४३ धावांत ५ विकेट्सही घेतल्या होत्या.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्यांदा भारतीय स्टार फिरकीपटूने एकाच कसोटीत केवळ शतकच केले नाही तर ५ विकेटही घेतले आहेत. या यादीत इयान बोथमने पाच वेळा हा पराक्रम केला आहे. रविचंद्रन अश्विनला या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. याचबरोबर अश्विनचा हा विक्रमी १०वा सामनावीर पुरस्कार होता.