Ravichandran Ashwin says Rohit Sharma to play for MI in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळताना दिसेल, असा विश्वास रविचंद्रन अश्विनने व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आणि पैशाबाबत त्याला कोणतीही डोकेदुखी होणार नाही. लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझीने आयपीएल २०२४ पूर्वी रोहित शर्माच्या आधी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. फ्रँचायझीचा हा निर्णय काही चाहत्यांना आवडला नाही. ज्यामुळे मुंबई इंडियन्स आणि हार्दिक यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
यंदा आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. ज्यामुळे असे मानले जात आहे की रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो. दरम्यान, रोहितचा सहकारी खेळाडू रविचंद्रन अश्विन वेगळे मत मांडले आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर रोहित शर्माबद्दल सांगितले की, “तुम्ही जर रोहितसारखा विचार करत असाल तरी ते चुकीचे नाही. कारण तो म्हणेल मला कोणतीही डोकेदुखी नकोय. मी भारताचा कर्णधार आहे. मी अनेकवेळा मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे. मी आता कर्णधार नसलो तरी मुंबईसोबत राहण्यात मला आनंद आहे. मी मुंबईसाठी खेळलो तर खूप छान होईल.” अश्विन पुढे म्हणाला, “मला खात्री आहे की बहुतेक खेळाडू असेच असतात. ठराविक टप्प्यानंतर, काही खेळाडूंना पैशाने काही फरक पडत नाही. रोहित पण अशा खेळाडूंपैकीच एक आहे.”
आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माचे दमदार प्रदर्शन –
आयपीएल २०२४ च्या मोसमात रोहितने बॅटने चांगली कामगिरी केली होती. त्याने ३२.०७ च्या सरासरीने आणि १५० च्या स्ट्राईक रेटने ४१७ धावा केल्या. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. यामध्ये नाबाद १०५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. रोहित २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये उदयोन्मुख खेळाडू म्हणून प्रवेश केला होता. रोहितने मुंबईसाठी १९९ आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २९.३९ च्या सरासरीने आणि १२९.८६ च्या स्ट्राईक रेटने ५,०८४ धावा केल्या आहेत. त्याने १९५ डावात एक शतक आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये नाबाद १०९ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
रोहितने १० वर्षात मुंबई इंडियन्सला ५ जेतेपदे मिळवून दिली –
रोहित शर्माने २०१३ मध्ये रिकी पॉन्टिंगकडून फ्रँचायझीचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर, रोहितने १० वर्षांत मुंबई इंडियन्सला पाच (२०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०) जेतेपद मिळवून दिले. त्यचबरोबर दोनदा प्लेऑफ्समध्ये पोहोचवले. मुंबई इंडियन्सने २०११ आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० चे जेतेपद पटकावले होते. यामध्ये रोहित २०१३ मध्ये कर्णधार तर २०११ मध्ये खेळाडू म्हणून संघाचा भाग होता.