भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान, फिरकीपटू रविचंद्रन आश्विन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ३१ वर्षीय रविचंद्रन आश्विनच्या नावावर ५२ कसोटी सामन्यांमध्ये सध्या २९२ विकेट जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळींचा टप्पा ओलांडायला आश्विनला अवघ्या ८ विकेटची आवश्यकता आहे. हा टप्पा आश्विनने ओलांडल्यास, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेनिस लिली यांच्या नावावर असलेला विक्रम आश्विनच्या नावावर जमा होईल. डेनिल लिली यांनी ५६ कसोटीत ३०० विकेटचा टप्पा पार केला होता. कोलकाता कसोटीत आश्विनने ही किमया साधल्यास गेली ३६ वर्ष लिली यांच्या नावावर असलेला विक्रम आश्विनच्या नावावर होईल.
२०१४ साली अवघ्या ४ कसोटी खेळणाऱ्या आश्विनने आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केलं होतं. यानंतर २०१५ सालात अवघ्या ९ कसोटी सामन्यांमध्ये आश्विनने तब्बल ६२ विकेट घेतल्या. यानंतर २०१६ साली आश्विननेच आपला विक्रम मोडीत काढत एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये ७२ विकेट घेतल्या. २०१७ सालात आतापर्यंत आश्विनच्या नावावर ४४ विकेट जमा आहेत, त्यात श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत असल्याने आश्विनला आपल्या बळींच्या संख्येत वाढ करण्याची चांगली संधी आलेली आहे. श्रीलंकेविरुद्ध १२ कसोटी सामन्यांमध्ये आश्विनने ३८ विकेट घेतल्या आहेत.
अवश्य वाचा – कोलकाता कसोटीवर पावसाचे सावट
कोलकाता कसोटीत ३०० बळींचा टप्पा ओलांडल्यास दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तीत आश्विनला स्थान मिळणार आहे. याचसोबत ३०० बळी घेणारा आश्विन हा भारताचा ३१ वा कसोटी गोलंदाज ठरणार आहे. रविचंद्रन आश्विनआधी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंह, जहीर खान या खेळाडूंनी हा कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पुढीलप्रमाणे –
१) डेनिल लिली – ऑस्ट्रेलिया – ५६ कसोटी सामने
२) मुथय्या मुरलीधरन – श्रीलंका – ५८ कसोटी सामने
३) रिचर्ड हेडली – न्यूझीलंड – ६१ कसोटी सामने
४) माल्कम मार्शल – वेस्ट इंडिज – ६१ कसोटी सामने
५) डेल स्टेन – दक्षिण आफ्रिका – ६१ कसोटी सामने
६) शेन वॉर्न – ऑस्ट्रेलिया – ६३ कसोटी सामने
७) अॅलन डोनाल्ड – दक्षिण आफ्रिका – ६३ कसोटी सामने
८) ग्लेन मॅकग्राथ – ऑस्ट्रेलिया – ६४ कसोटी सामने
९) फ्रेड ट्रुमॅन – इंग्लंड – ६५ कसोटी सामने
१०) वकार युनूस – पाकिस्तान – ६५ कसोटी सामने